लोणावळ्यात सोमवारी मध्यरात्रीपासून सात दिवसांचा लॉकडाऊन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 08:04 PM2020-07-18T20:04:15+5:302020-07-18T20:04:59+5:30
पुणे, पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्याचा काही भाग 13 जुलैपासून लॉकडाऊन करण्यात आला असताना लोणावळा शहर मात्र सुरू होते.
लोणावळा : शुक्रवार व शनिवार दोन्ही दिवस लोणावळ्यात कोरोनाचे पाच पाच रुग्ण मिळून आल्याने लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने लोणावळा शहर सोमवारी मध्यरात्रीपासून सात दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी रवी पवार यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पुणे, पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्याचा काही भाग 13 जुलै पासून लॉकडाऊन करण्यात आला असताना लोणावळा शहर मात्र सुरू होते. मात्र याच काळात लोणावळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली.कोरोनामुक्त लोणावळ्यात कोरोनाचा शिरकाव झाला व तो वेगाने वाढत असल्याने ही साखळी तोडण्यासाठी सदरचा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. लोणावळा शहरात शुक्रवारी पाच व शनिवारी पाच कोरोना रुग्ण मिळून आले असून 13 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. लोणावळा शहरात आज अखेर कोरोना रुग्णांची संख्या 28 झाली असून पाच जणांच्या नोंदी नवी मुंबई येथे झाल्या आहेत.
लोणावळ्यात कोरोना नसल्याने येथील बाजारपेठ नियमित सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान सुरू होती. मात्र बाजारपेठेत नागरिक फिजिकल डिस्टन्सिंगचे योग्य पालन करत नसल्याचे समोर आल्यानंतर येथे 14 भरारी पथके नेमत कारवाई मोहिम हाती घेण्यात आली होती. त्यातच चेहर्यावर मास्क न लावणार्या शेकडो जणांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. असे असताना बाजारातील गर्दी कमी होत नसल्याने व कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने प्रशासनाने लोणावळा सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी पहिले चार दिवस कडकडीत बंद असेल या काळात फक्त मेडिकल व दवाखाने सुरु राहतील. दुध केंद्र सकाळी दोन तास खुली राहतील. चार दिवसानंतर किराणा व भाजीपाला दुकानांना दोन ते तिन तास उघडण्याची मुबा दिली जाईल असे मुख्याधिकारी रवी पवार यांनी सांगितले. दोन दिवसात नागरिकांनी बाजारात गर्दी न करता सात दिवस पुरेल ऐवढेच साहित्य खरेदी करावे अनावश्यक गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दोन दिवसात दहा रुग्ण
लोणावळ्यात शुक्रवारी भांगरवाडीत 2, पांगोळीत 2 व खंडाळ्यात 1 कोरोना रुग्ण मिळून आला तर शनिवारी भांगरवाडी येथे 1 वलवण गावात 1 व खंडाळ्यात 3 रुग्ण मिळून आले आहेत.