भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकासाठी आले सात आराखडे, एका आराखड्याची होणार निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 09:41 AM2024-01-01T09:41:23+5:302024-01-01T09:41:39+5:30

सादर केलेल्या सातपैकी एका आराखड्याची निवड राज्य सरकार करणार असून, तसा निर्णय पुणे महापालिकेला कळविण्यात येणार आहे...

Seven designs were submitted for Bhidewada National Monument, one design will be selected | भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकासाठी आले सात आराखडे, एका आराखड्याची होणार निवड

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकासाठी आले सात आराखडे, एका आराखड्याची होणार निवड

पुणे : भिडेवाडा या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे सात नामवंत वास्तू विशारदाकडून (आर्किटेक्ट) आराखडे आले आहेत. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्यापुढे त्याचे सादरीकरणदेखील झाले आहे. या प्रसंगी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे उपस्थित होते. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे ऑनलाइन हजर होते.

सादर केलेल्या सातपैकी एका आराखड्याची निवड राज्य सरकार करणार असून, तसा निर्णय पुणे महापालिकेला कळविण्यात येणार आहे. ही बाब या स्मारकाच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक असणार आहे. प्रदीर्घ संघर्षानंतर या कामाला वेग आला असून, सरत्या वर्षात प्रश्न मार्गी लागला आणि नव्या वर्षात कामाला सुरुवात हाेणार ही पुणेकरांसाठी आश्वासक आणि आनंदाची बाब आहे.

पुणे महापालिका या कामाचे पुर्वगणनपत्रक तयार करून निविदा काढणार आहे. त्यामुळे नवीन वर्षात भिडेवाडा स्मारकाचे काम मार्गी लागणार आहे. भिडेवाडा आता नव्या रूपात अवतरणार आहे. महात्मा जाेतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ राेजी बुधवार पेठेतील भिडे वाड्यात देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली हाेती. या घटनेला १७५ वर्ष पूर्ण झाले. फुले दाम्पत्याच्या या कार्यास अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या आठवणी जपण्यासाठी म्हणून भिडे वाडा हा राष्ट्रीय स्मारक झाला पाहिजे, अशी मागणी गेली अनेक वर्ष होत हाेती. या संदर्भात अनेक वेळा मोर्चे, आंदोलने झाली. अखेर भिडेवाड्याची जागा ताब्यात घेण्याचा निर्णय पुणे महापालिकेच्या मुख्य सभेने २००८ मध्ये घेतला हाेता. मात्र हा प्रश्न न्यायालयात गेला आणि अनेक वर्ष कार्यवाही रखडली.

तब्बल १३ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर पुणे महापालिकेने उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही निर्णय आपल्या बाजूने आणण्यात बाजी मारली. त्यानंतर एका महिन्यात म्हणजे ३ डिसेंबरपर्यंत जागा महापालिकेच्या ताब्यात द्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने जागा मालक आणि भाडेकरूंना दिले होते. त्यानंतर पुणे महापालिकेने कडेकोट पोलिस बंदोबस्तात ५ डिसेंबर रोजी मध्यरात्री भिडेवाडा ताब्यात घेण्याची कारवाई केली. पहाटे पावणेचार पर्यंत जुने स्ट्रक्चर जमीनदोस्त केले. त्यानंतर महापालिकेने आराखडे मागिवले होते. त्यानुसार सात नामवंत वास्तू विशारदांकडून (आर्किटेक्ट) आराखडे आले आहेत. भिडेवाडा आता नव्या रूपात अवतरणार आहे.

भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे सात नामवंत वास्तू विशारदाकडून (आर्किटेक्ट) आराखडे आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे त्याचे सादरीकरणही करण्यात आले आहे. यापैकी एका आराखड्याची निवड राज्य सरकार करणार आहे. त्याबाबतचे निर्देश पुणे महापालिकेकडे आल्यानंतर पूर्वगणनपत्रक तयार करून निविदा काढली जाणार आहे.

- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

Web Title: Seven designs were submitted for Bhidewada National Monument, one design will be selected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.