सोमवारी मुख्यमंत्र्यांसह सात मंत्री पोलादपूरमध्ये उपस्थित राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 05:38 AM2020-02-17T05:38:24+5:302020-02-17T05:38:37+5:30
तानाजी मालुसरे यांचा ३५०वा शौर्य दिन : ४५० अधिकारी तैनात
पोलादपूर : नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ३५०वा शौर्य दिन व पुण्यतिथीनिमित्त १७ फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह मंत्रिमंडळातील सात मंत्री उपस्थित राहणार आहेत. यासाठी पोलादपूरमधील उमरठ, साखर येथे हेलिपॅडची निर्मिती केली आहे.
अलिबाग येथील तीन रुग्णवाहिकांसह महाड नगरपालिका, महाड औद्योगिक वसाहत, रोहा-धाटाव औद्योगिक वसाहतीचे अग्निशमन बंब उपलब्ध असणार असून, ४५० अधिकारी व कर्मचारी ठिकठिकाणी तैनात ठेवण्यात येणार असल्याची माहिती शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत प्रांताधिकाऱ्यांनी दिलीे.
१७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पुत्र तेजस ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीरंग बारणे आदीसह पालकमंत्री आदिती तटकरे, खा. सुनील तटकरे, आ. भरत गोगावले, जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. साखर येथे दोन हेलिपॅड निर्माण करण्याचे काम करण्यात येणार होते. मात्र, ग्रामस्थांनी ‘झाडे जगवा, झाडे वाचवा’ संदेश देत झाडे तोडण्यास अटकाव केल्याने साखर आणि उमरठ येथे एक हेलिपॅड तयार केले आहे. मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी नव्याने रस्त्याचे काम करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी पाण्याच्या व्यवस्थेसह बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. पितळवाडी प्राथमिक आरोग्यकेंद्र व कापडे येथील आरोग्यकेंद्रामध्ये वैद्यकीय पथक उपलब्ध असणार आहे. या ठिकाणी महाडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भास्कर जगताप व पोलादपूरचे डॉ. सोनवणे उपस्थित राहणार असल्याची माहिती बैठकीदरम्यान देण्यात आली. प्रांत कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत विविध खात्याचे अधिकारी, आ. भरत गोगावले आदी उपस्थित होते. या वेळी अधिकाऱ्यांनी उमरठ येथील विविध कामाची पाहणी केली.