सात महिने अवकाळी; आता पावसाची दडी!

By admin | Published: July 7, 2015 03:15 AM2015-07-07T03:15:44+5:302015-07-07T03:15:44+5:30

नको तेव्हा पाऊस व हवा तेव्हा दडी... यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. नोव्हेंबर-डिसेंबर २0१४ व जानेवारी ते मे २0१५ असा गेल्या सात महिन्यांत दर महिन्याला अवकाळीचा फेरा सुरू होता

Seven months downfall; Now a rainbow! | सात महिने अवकाळी; आता पावसाची दडी!

सात महिने अवकाळी; आता पावसाची दडी!

Next

बापू बैलकर  पुणे
नको तेव्हा पाऊस व हवा तेव्हा दडी... यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. नोव्हेंबर-डिसेंबर २0१४ व जानेवारी ते मे २0१५ असा गेल्या सात महिन्यांत दर महिन्याला अवकाळीचा फेरा सुरू होता. नको नको रे पावसा, असे तेव्हा बळीराजा म्हणत होता; मात्र तो थांबत नव्हता. आता ‘ये रे येर पावसा’ असे म्हणत असताना तो पडत नाही.
काही वर्षांपासून वातावरणातील बदलामुळे हीच स्थिती जिल्ह्यात आहे. नोव्हेंबर व डिसेंबर २०१४मध्ये जिल्ह्यात अवकाळी गारपिटीमुळे शेती व फळपिकांचे मोठे नुकसान झाले. यात ४ हजार ६८६ हेक्टरवली भात व द्राक्ष पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. सर्वाधिक फटका भातपिकाला बसला. सुमारे ४ हजार २३४ हेक्टरवरील भातपीक पाण्यात गेले. त्यानंतर २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी पुन्हा अवकाळी व गारपीट झाली. यात ५८ गावांतील १५ हजार ८९२ शेतकऱ्यांचे ६ हजार ३०५ हेक्टरवरील पिके व फळपिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. त्यानंतर पुन्हा १० एप्रिल रोजी अवकाळी पाउस झाला. याचा कांदा, डाळिंबासह आंब्याला मोठा फटका बसला. हे चक्र गेले सात महिने सुरू होते. या वेळी बळीराजा ‘नको नको रे पावसा...’ अशी विनवणी करीत होता; मात्र तो नुकसान करीत राहिला. याचा खरीप व रब्बी हंगामांतील पिकांना मोठा फटका बसला होता.
हवामान खात्याने वर्तवलेल्या पावसाच्या आंदाजामुळे या वर्षीच्या शेतकऱ्यांच्या खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. कृषी विभागानेही जय्यत तयारी केली होती. ५ जूनला मॉन्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली. तो काही ठिकाणी चांगला पडला. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांची लगबग सुरू झाली. भाताचे ६२ हजार ३०० हेक्टर क्षेत्र असून, १०० टक्के क्षेत्रावर रोपवाटिका शेतकऱ्यांनी टाकल्या आहेत. त्याची रोपेही वर आली असून, पावसाची गरज आहे. बाजरीचे ७४ हजार १०० हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत २० हजार हेक्टरवर म्हणजे साधारण ३५ टक्के पेरणी झाली आहे. भुईमुगाचे ३८ हजार ३०० हेक्टर क्षेत्र असून, १२ हजार २०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. मक्याचे ७ हजार ४०० हेक्टर क्षेत्र असून, ७ हजार ३०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीनचे २ हजार ७०० तसेच नाचणीचे १० हजार ८०० हेक्टर क्षेत्र आहे. नाचणीच्याही रोपवाटिका शेतकऱ्यांनी टाकल्या आहेत. साधारण जिल्ह्यात ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ३० ते ३५ टक्के पेरणी झाली आहे.
मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. दोन दिवस दमदार पाऊस झाल्यानंतर त्याने विश्राती घेतली. मॉन्सून दाखल झाला; मात्र तो म्हणावा तसा बरसला नाही. पण, २५ जूननंतर तीन दिवस चांगला पाऊस पडला. त्याने जूनची सरासरी ओलांडली. मात्र, गेल्या १०- १२ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर आहे.

Web Title: Seven months downfall; Now a rainbow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.