पुण्यात काेरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे सात नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 08:33 AM2022-07-13T08:33:20+5:302022-07-13T08:34:11+5:30
सर्व बाधित पुण्यातील...
पुणे : ओमायक्राॅनच्या नव्या तीन प्रकारच्या व्हेरिएंटची लागण झालेल्या सात नव्या रुग्णांची नोंद पुण्यात मंगळवारी झाली. यामध्ये बीए. ४, बीए. ५ आणि बीए. २.७५ चे रुग्ण असून, ते सर्व जण पुण्यातील आहेत. ते सर्व घरगुती विलगीकरणात बरे झाले आहेत. या सात जणांसह राज्यात आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३२ झाली आहे.
पुण्यात बीए. ४ आणि बीए. ५ व्हेरिएंटचे ६ रुग्ण तर बीए. २.७५चे ३ रुग्ण आढळले आहेत. आराेग्य विभागाने ३१ मे ते ५ जुलै या काळात पुणे, अहमदनगर, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या जिल्ह्यांतील जे नमुने तपासले, त्यात हे रुग्ण आढळले आहेत. या रुग्णाचा साथरोग शास्त्रीय आढावा घेतला जात आहे, असे राज्याच्या साथराेग विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
पुण्यात मंगळवारी ९१२ रुग्णांची नाेंद
राज्यात मंगळवारी काेराेनाचे २ हजार ८८२ रुग्ण बरे हाेऊन घरी गेले, तर २ हजार ४३५ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. यापैकी पुण्यातील रुग्णांची संख्या ९१२ इतकी आहे. त्यापैकी पुणे शहरात ५६८, ग्रामीणमध्ये १५३ आणि पिंपरी चिंचवडमध्ये १९१ रुग्णांचा समावेश आहे.