ऑनलाईन अभ्यासासाठी लोकप्रिय सात प्लॅटफॉर्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:11 AM2021-09-24T04:11:37+5:302021-09-24T04:11:37+5:30
---- गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिक्षणाची क्रेझ वाढली असून सुरुवातीला जड जाणारे ऑनलाईन शिक्षण आता ...
----
गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिक्षणाची क्रेझ वाढली असून सुरुवातीला जड जाणारे ऑनलाईन शिक्षण आता शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांना अंगवळणी पडत आहे. शाळेेचे ऑनलाईन शिक्षणाबरोबरच सध्या इंटरनेट जगतामध्ये आणखी काही ऑनलाईन शिक्षणाचे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करायला मजाही येते आणि विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून ते स्टडी मटेरिअलपर्यंत अनेक गोष्टींची माहितीही मिळते, अशा काही लोकप्रिय सात प्लॅटफॉर्मची माहिती.
यू-ट्यूब
यू-ट्यूब माहिती नाही अशी मुले यंदाच्या युगात शोधून सापडणार नाहीत. गुगलने २००६ मध्ये यु-ट्यूबसारखं माध्यम खरेदी केले आणि शिक्षणाच्या प्लॅटफॉर्म आणखी वर नेला. सध्या अभ्यासापासून, स्वयंपाकापर्यंत, शेतीपासून ते उद्योगापर्यंत, भाषणांपासून ते भाषांपर्यंत, विविध अर्ज भरण्यापासून ते त्याच्या अभ्यासाच्या साहित्यांपर्यंत अनेक गोष्टी यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. यू-ट्यूबसारखे माध्यम मोफत असल्याने यावर पहिलीपासून ते अगदी पदव्युत्तर विभागापर्यंतचे साऱ्याच पाठ्यपुस्तकांचे स्टडी मटेरीअल सहज उपलब्ध होतात. विशेषत: लहान मुलांच्या पाठ्यपुस्तकांच्या अनेक स्टडी मेटेरीअल कार्टून्सच्या स्वरूपात उपलब्ध असल्यामुळे मुलांमध्ये हे यू-ट्यूब माध्यम सर्वात जास्त पसंतीचे आहे. यू-ट्यूबवरील लाखो करोडो व्हिडिओमधून आपल्या मुलांना हवे असलेल्या व्हिडिओंची प्लेलिस्ट बनविणे आणि तसे व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सोय असल्यामुळे हे माध्यम वापरताना नियोजन करणे गरजेच आहे.
दीक्षा
मुलांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी भारत सरकारच्या वतीने दीक्षा ॲप सुरू करण्यात आले आहे. एनसीईआरटीने प्रकाशित कलेल्या बारावीपर्यंतची सर्व पाठ्यपुस्तके यावर उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे पाठ्यपुस्तकांमध्ये क्यूआर कोड दिला असून, ते ॲपच्या माध्यमातून तो क्यूआर कोड स्कॅन केल्यावर त्या संदर्भातील स्टडी मटेरिअल मोबाईलवर दिसायला सुरवात होते. हा ॲप केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर शिक्षकांसाठीसुद्धा खूपच उपयुक्त असून त्यामुळे शिक्षकांना पुस्तके वाचण्यासाठी व संदर्भ मिळविण्यासाठी याचा छान उपयोग होऊ शकतो. प्ले स्टोअरवर हा ॲप मोफत उपलब्ध आहे.
लेविरेज एज्यू (Leverage Edu)
Leverage Edu यामध्ये अभ्यासासंबंधी अनेक ब्लाॅग आहेत. केवळ शैक्षणिक मेटेरिअलच नव्हे तर सध्या विविध करिअरच्या वाटा आणि त्यासाठी काय प्रयत्न करावेत, त्याच्या परीक्षांपासून ते तारखांपर्यंत अनेक गोष्टींच्या माहितीचे ब्लॉग या ठिकाणी उपलब्ध आहेत. याबरोबरच भारतातील विविध विद्यापीठांमध्ये चालणारे कोर्स आणि त्याबाबतची माहितीही येथे पहायला मिळते. भारताबरोबरच परदेशी विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठी नेमके काय करावे, याची माहिती देणारेही अनेक ब्लॉग येथे मिळतात. शिवाय अभ्यासामध्ये जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर तज्ञांचा सल्ला घेण्याची सोयही या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. त्यामुळे हा मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी हा प्लॅटफॉर्मही महत्त्वाचा ठरतो.
टेड (TED-Ed)
लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झालेली अध्ययन आणि अध्यापनाची पोकळी भरून काढण्यासाठी अनेक मोबाईल ॲप्स, वेबसाईट, ब्लॉग उदयास आले. त्यापैकी एक उपयुक्त आणि लोकप्रिय ठरलेला वेबसाईट म्हणजेट टेड. यावर विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक आणि पालकांसाठी स्वतंत्र लिंक दिली गेली आहे. याशिवाय विषयांच्या यादीचे स्वतंत्र लिंक आहे. ज्यावर क्लिक करताच अनेक स्टडी मटेरिअल टेक्स्ट आणि व्हिडिओ माध्यमाव्दारे तयार आहेत. विविध विषयांवर एक हजारांहून अधिक शैक्षणिक व्हिडिओ यावर उपलब्ध असून त्यामुळे स्वयंअध्ययनाचा मार्ग सोपा झाला आहे.
लेवीरेज लाईव्ह (Leverage Live)
लेवीरेज लाइव हे ॲप आणि वेबसाईट ही प्रामुख्याने आईईएलटीएस, सैट, जीमैट, जीआरई यांसारख्या परीक्षांसाठी निर्माण करण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मवर २० हजारांहून अधिक मेंटर्स आहेत, जे मुलांची तयारी करून घेण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करतात. या परीक्षांचा अभ्यास कसा करावा, त्यासाठी काय स्टडी मटेरिअल वापरावे, यांसह ते कुठे व कसे उपलब्ध होतील इथपर्यंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत असल्याने हा प्लॅटफॉर्मही माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय ठरतो आहे.
हार्वर्ड एक्सटेंशन स्कूल
हावर्ड विद्यापीठाचे नाव जगाला परिचित आहेच. कोरोनाच्या काळात हावर्ड विद्यापीठाने अनेक फ्री कोर्सेस उपलब्ध केले. जे दहावी, बारावीनंतर करता येऊ शकतात. अगदी प्रमाणपत्र कोर्सपासून ते पदवी व पदव्युतरपर्यंत तब्बल ९०० पेक्षा जास्त अभ्यासक्रम विद्यापीठाने उपलब्ध केले आहेत. हावर्ड विद्यापीठात प्रवेश घेणे हे सर्वच विद्यार्थ्यांसाठी एक स्वप्न आहे. त्यामुळे ऑनलाईन कोर्सेसच्या माध्यमातून या विद्यापीठात शिकण्याची एक मोठी संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे.
डुओलिंगो (Duolingo )
सध्या अनेक भाष शिकण्याचा मोठा ट्रेंड सुरू आहे. सीबीएसईसह अनेक शाळांमध्ये फ्रेंच, जर्मन, रशियनसारख्या भाषा विषय शिकविले जातात, शिवाय विद्यापीठांमध्येही अशा भाषांवर विविध अभ्यासक्रम आहे. ज्या भाषांच्या माध्यमातून सरकारी नोकरींसह विविध खासगी मल्टिनॅशनल कंपनीमध्ये मोठे करिअर आहे. त्यामुळे शालेय वयातच भाषा विषयामध्ये करिअर करण्याचे नियोजन असेल तर डुओलिंगो ही साईट महत्त्वाची ठरते. विशेष म्हणजे येथे भाषांचे प्रशिक्षण मोफत दिले जाते. ज्यामुळे विविध देशांतील भाषा शिकण्याचे कौशल्य सहज साध्य होते.