सात हजार किलो तांदूळ विक्री
By Admin | Published: February 5, 2016 02:18 AM2016-02-05T02:18:24+5:302016-02-05T02:18:24+5:30
जिल्हातील आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा व हवेली तालुक्यांत सर्वाधिक उत्पादित होत असलेल्या तांदळासाठी सावित्री महोत्सवाद्वारे हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या
पुणे : जिल्हातील आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा व हवेली तालुक्यांत सर्वाधिक उत्पादित होत असलेल्या तांदळासाठी सावित्री महोत्सवाद्वारे हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या पहिल्याच प्रयोग यशस्वी झाला. तीन दिवसांत सात हजार किलो तांदळाची विक्री झाली. आंबेमोहर व हातसडीच्या तांदळाला मागणी होती.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा परिषदेने ही बाजारपेठ उपलब्ध करून दिली होती.
जिल्ह्यातील सह्याद्रीपट्ट्यात सुमारे ३८ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताचे उत्पन्न घेतले जाते. डोंगरी भागातील शेतकरी व महिला बचत गट मोठ्या प्रमाणावर बासमती, आंबेमोहोर, कोलम, इंद्रायणी, कोळना, जिर, रायभोग, खडक्या, चिनौर, जयश्रीराम, केशर इ. जातीच्या तांदळाचे उत्पादन करतात. परंतु त्यांनी उत्पादित केलेल्या तांदळाला बाजारपेठेत अपेक्षित भाव मिळत नाही. हातसडीच्या तांदळाला मागणी असूनही ग्राहकांना तो उपलब्ध होत नाही. यामुळे ‘सावित्री तांदूळ महोत्सव २०१६’ चे आयोजन करण्यात आले होते.
२ ते ४ फेब्रुवारी असे तीन दिवस हा महोत्सव जिल्हा परिषदेच्या आवारात झाला. ८ तालुक्यांमधून २२ स्वयंसाह्यता गटांनी उत्पादित केलेला तांदूळ विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. सुमारे ७००० किलो इतक्या तांदळाची विक्री झाली व या विक्रीतून महिलांना सुमारे ३,५०,००० रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले. तांदूळ खरेदीसाठी शासकीय कर्मचारी, तसेच पुण्यातील नागरिकांनी तांदूळ खरेदीसाठी गर्दी केली होती.
ग्रामीण विकास यंत्रणेने हाती घेतलेल्या अभिनव उपक्रमाचे कौतुक करून महिला बचत गटांच्या सदस्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या कामाला बाजारपेठ उपलब्धतेसाठी जिल्हा परिषदेमार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन अध्यक्ष प्रदीप कंद यांनी दिले.
हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहायक प्रकल्प अधिकारी डॉ. सुमंत पांडे व सहायक प्रकल्प अधिकारी (महिला) सपना करकंड यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)