सात हजार किलो मिसळीचा झणझणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:11 AM2021-03-16T04:11:30+5:302021-03-16T04:11:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एकूण ३० लोकांच्या मदतीने तयार केलेली ७ हजार किलो मिसळ तीन तासांत तीन स्वयंसेवी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एकूण ३० लोकांच्या मदतीने तयार केलेली ७ हजार किलो मिसळ तीन तासांत तीन स्वयंसेवी संस्थांमार्फत ३० हजार लोकांना वाटण्यात आली.
सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि प्रसिद्ध बल्लवाचार्य विष्णू मनोहर यांच्या पुढाकारातून रविवारी (दि. १४) पुण्यात महामिसळीचा कार्यक्रम घेण्यात आला. जगात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्वरूपात मिसळ बनविण्यात आली असल्याचा दावा आयोजकांनी केला.
रविवारी पहाटे २ ते सकाळी ९ या सात तासांच्या वेळेत ही मिसळ तयार करण्यात आली. त्याच दिवशी सकाळी ९ ते दुपारी १२ या तीन तासांच्या वेळेत त्याचे वाटप झाले. या महामिसळीसाठी दीड हजार किलो मटकी, पाचशे किलो कांदा, सव्वाशे किलो आले, सव्वाशे किलो लसूण, चारशे किलो तेल, १८० किलो कांदा-लसूण मसाला, पन्नास किलो मिरची भुकटी, पन्नास किलो हळद, पंचवीस किलो मीठ, ११५ किलो खोबरे, पंधरा किलो तेज पान, बाराशे किलो फरसाण, साडेचार हजार लीटर पाणी आणि पन्नास किलो कोथिंबीर वापरण्यात आली. त्यासाठी ३३ बाय २२चे चुलवणावर १० बाय १० व ७ बाय ७ आकाराच्या कढईत ही मिसळ शिजविण्यात आली.
“पुणेरी मिसळ पुण्याचे वैशिष्ट्य आहे. महामिसळ तयार करून विश्वविक्रम करावा. या महामिसळच्या माध्यमातून गरजू लोकांना अन्नदान करावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले. मास्टरशेफ विष्णू मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या महामिसळीमुळे विद्यार्थ्यांना ज्ञान मिळाले,” असे ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.संजय चोरडिया म्हणाले. बल्लवाचार्य विष्णू मनोहर यांनी सांगितले की, एवढ्या मोठ्या प्रमाणात मिसळ बनवताना खूप मजा आली. सुषमा चोरडिया, सिद्धांत चोरडिया, प्रा.शैलेश कुलकर्णी, सचिन इटकर, प्रा.सुनील धाडीवाल, प्रा.प्रतीक्षा वाबळे, प्रा.शेफाली जोशी, समीरा नाईक, प्रा.अजित शिंदे, नयना गोडांबे, प्रा.मंदार दिवाने आदी यावेळी उपस्थित होते.