पुण्यात पुन्हा गाड्या पेटवून देण्याचा प्रकार; ७ दुचाकींचं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 10:04 AM2019-07-11T10:04:14+5:302019-07-11T10:08:13+5:30
सातारा रोडवरील बालाजीनगरमधील घटना
पुणे : रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाड्या पेटवून देण्याचा प्रकार पुण्यात मध्यरात्री पुन्हा घडला आहे. पुणे सातारा रोडवरील बालाजीनगर येथील एलोरा पॅलेस येथे मध्यरात्रीच्या सुमारास पार्क केलेल्या दुचाकींना आग लावण्यात आली. या आगीत ७ दुचाकी जळून खाक झाल्या. ही घटना पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
पहाटे २ वाजून ४२ मिनिटांनी बालाजीनगर येथे गाड्यांना आग लागल्याचा कॉल होता, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली. त्यानंतर कात्रज येथील गाडी तातडीने घटनास्थळी रवाना झाली. त्यांनी काही वेळातच ही आग विझवली. या आगीत ३ दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या असून ३ अर्धवट जळाल्या आहेत. तर एका गाडीला आगीची झळ पोहचली आहे. या गाड्या जेथे पार्क केल्या होत्या, त्याच्या वरील बाजूने काही तारा गेल्या होत्या. या आगीमध्ये त्या ताराही जळून खाक झाल्या. या गाड्यांच्या आगीची धग इतकी जास्त होती की, रस्त्याच्या पलीकडे असलेल्या टपऱ्यांची शटरही तापली होती. ही आग नेमकी गाड्या पेटवल्यामुळे लागली की या गाड्यांच्या वरुन गेलेल्या तारांमधून शार्ट सर्कीट झाल्याने लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. सहकारनगर पोलीस ठाण्याकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.