पुणे-सातारा महामार्गावरील सात गावांचा रिंगरोडला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:07 AM2021-06-30T04:07:41+5:302021-06-30T04:07:41+5:30
भोर : पुणे-सातारा महामार्गावरील सात गावांमधून जाणाऱ्या रिंगरोडमुळे शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी जात असून, शेतकऱ्यांना विश्वासात घेत नसल्याने रिंगरोडविरोधी ...
भोर : पुणे-सातारा महामार्गावरील सात गावांमधून जाणाऱ्या रिंगरोडमुळे शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी जात असून, शेतकऱ्यांना विश्वासात घेत नसल्याने रिंगरोडविरोधी कृती समितीने भोर येथील उपविभागीय कार्यालयासमोर सात दिवस चक्री उपोषण सुरू राहणार आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य आण्णासाहेब भिकुले यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू आहे. या वेळी शरद इंदलकर, सोमनाथ पवार, विजय इंदलकर, सपंत शितोळे, रवींद्र इंदलकर, शामसुंदर जायगुडे, दीपक भडाळे, महेश कोंडे यांनी सहभाग घेतला आहे. गाथा वाचन करून पुढील सात दिवस दररोज एक गाव याप्रमाणे सात दिवस चक्री उपोषण सुरू आहे
रिंगरोडसंदर्भात खोपी, कांबरेखेबा, केळवडे, कांजळे, कुसगाव रांजे, नायगाव येथील शेतकऱ्यांनी रिंगरोडला तीव्र विरोध केला आहे. रिंगरोडबाबत शासनाला व लोकप्रतिनिधींना निवेदन दिले असून, उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांचे निवेदन वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवले आहे
सात गावांतून जाणाऱ्या रिंगरोडला शेतकऱ्यांचा विरोध असून, रिंगरोडबाबत शेतकऱ्यांची बाजू विचारात घेतली जात नाही. शेतकऱ्यांच्या हरकतींना उत्तर न देता पोलीस बळाचा वापर करून रिंगरोडची मोजणी केली जात आहे. सदर रिंगरोडमुळे काही शेतकऱ्यांची बागायती जमिनी जात असून, याबाबत शेतकऱ्यांना विश्वासात घेतले गेलेले नाही. याचा निषेध करीत शेतकऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्री उपोषण सुरू केले असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य आण्णासो भिकुले यांनी सांगितले.
पुणे-सातारा महामार्गावरील व आजूबाजूच्या सात गावांतून रिंगरोड जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी जात असून जमिनीला सोन्याचा भाव आहे. या शिवाय जमिनी रिंगरोडमध्ये गेल्यास अनेकांचे उत्पन्नाचे साधनच बंद होणार आहे. जमिनीबाबत शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जात नसून पोलीस बळाचा वापर करून जमिनीची मोजणी केली जात आहे. त्यामुळे सात गावांतील शेतकऱ्यांचा रिंगरोडला मोठा विरोध झाला असून, त्याविरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सात गावांतील शेतकरी दररोज एक गाव याप्रमाणे चक्री उपोषण करीत आहेत.