वन शेतीसाठी पावणेसात कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 01:13 PM2018-06-19T13:13:21+5:302018-06-19T13:13:21+5:30
केंद्र सरकारने शाश्वत शेती अभियानांतर्गत वनशेती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे : वन शेतीसाठी रोपवाटिका उभारण्यासाठी यावर्षी ६ कोटी ६६ लाख रुपयांचे अनुदान केंद्र आणि राज्यसरकार मिळून देणार आहे. या वृक्षारोपणासाठी एकूण प्रकल्प किंमतीच्या निम्मी रक्कम सरकारकडून दिली जाणार असून निम्मा वाटा संबंधित लाभार्थ्याला उचलवा लागणार आहे.
केंद्र सरकारने शाश्वत शेती अभियानांतर्गत वनशेती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत देण्यात येणाऱ्या निधीत ६० टक्के केंद्र आणि ४० टक्के राज्य सरकारचा वाटा असणार आहे. त्या ९ कोटी ५८ लाख रुपयांच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. त्यातील ६ कोटी ६६ लाख ६७ हजार रुपयांचा निधी या वर्षांत खर्च केला जाणार आहे. त्यात केंद्र सरकारकडून ४ कोटी आणि २ कोटी ६६ लाख ६७ हजार रुपये राज्य सरकार देणार आहे.
बांधावरील वृक्षारोपणासाठी ७ लाख २० हजार वृक्षांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी पहिल्या वर्षांत १ कोटी, कमी घनतेचे वृक्षारोपण ७०० हेक्टरवर करण्यात येणार असून त्यासाठी ३९.२० लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. उच्चघनतेच्या दोनशे ते ४०० हेक्टर क्षेत्रासाठी अनुक्रमे २४ आणि १४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.