सातवा वेतन आयोगाचा प्रस्ताव पडून : कामगार संघटनेचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:09 AM2021-05-28T04:09:25+5:302021-05-28T04:09:25+5:30
पुणे : महापालिकेच्या ऑनलाइन खास सभेत सातव्या वेतन आयोग लागू करण्याचा ठराव मान्य करण्यात आला़ परंतु, त्यानंतर नगरसचिव ...
पुणे : महापालिकेच्या ऑनलाइन खास सभेत सातव्या वेतन आयोग लागू करण्याचा ठराव मान्य करण्यात आला़ परंतु, त्यानंतर नगरसचिव कार्यालयाने हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पालिका आयुक्तांकडे पाठविला असला तरी, आयुक्त कार्यालयाने हा प्रस्ताव लेखा विभाग, सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला आहे. मात्र हे दोन्ही विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने अद्यापही राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठविला नसल्याचा आरोप कामगार संघटनेने सभागृह नेते गणेश बिडकर यांच्याकडे केला आहे़
कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी सभागृह नेते बिडकर यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. तेव्हा सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणीसाठी राज्य सरकारकडे प्राधण्यक्रमाने पाठपुरावा करण्याचे आश्वासन बिडकर यांनी दिले़ तर पालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तातडीने लागू झाला पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही असून, या संदर्भात दोन दिवसांपूर्वीच प्रशासनातील अधिकाºयांची बैठक घेत हा ठराव मान्यतेसाठी तातडीने राज्य सरकारकडे पाठवावा अशा सूचना देण्यात आल्या असल्याचेही बिडकर यांनी सांगितले़
दरम्यान, प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे अद्यापही वेतन आयोगाचा ठराव राज्य सरकारकडे पाठविला जात नसल्याने, याचा निषेध म्हणून महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी काळ्या फिती लावून आंदोलन केले़
-----------------------