अभियांत्रिकीच्या प्रवेशात सावळा गोंधळ
By admin | Published: July 13, 2016 01:01 AM2016-07-13T01:01:10+5:302016-07-13T01:01:10+5:30
जेईई परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून सध्या वंचित ठेवले जात असून, एमएचटी-सीईटी परीक्षेत शून्य गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना
पुणे : जेईई परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून सध्या वंचित ठेवले जात असून, एमएचटी-सीईटी परीक्षेत शून्य गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना सध्या प्रवेश देण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. तसेच आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनची (एआयसीटीई) मान्यता नसलेल्या महाविद्यालयात राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाने काही विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेत सावळा गोंधळ सुरू असल्याचे समोर आले आहे.
अभियांत्रिकी, मेडिकल व फार्मसीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य शासनाकडून एकच प्रवेश पूर्व परीक्षा (एमएचटी-सीईटी) घेण्यात आली. मात्र, राज्याच्या सीईटी परीक्षेच्या गुणांवर मेडिकल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश न देता नीट परीक्षेच्या आधारेच प्रवेश दिले जातील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. परिणामी, सीईटी परीक्षेबरोबरच जेईई आणि नीट परीक्षेचे महत्त्व अधिक असल्याची खात्री विद्यार्थी व पालकांना पटली. त्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेचे गुण भरता जेईईचे गुणप्रवेश अर्जात भरले. मात्र, राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम सीईटीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर जेईईच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. परिणामी, सध्या जेईईचे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत.
सीईटी परीक्षेत शून्य गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश देणे आवश्यक होते. मात्र, डीटीईने शून्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश न देता जेईईच्या विद्यार्थ्यांना प्रथम
प्रवेश दिले. परंतु, डीटीईच्या अधिकाऱ्यांना ही बाब उशिरा लक्षात आली. त्यामुळे जीईईच्या गुणांवर प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना तुम्हाला देण्यात आलेला प्रवेश रद्द करण्यात आला असल्याचे एसएमएसद्वारे कळविले जात आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयांनी दर वर्षी एआयसीटीईची मान्यता घेणे आवश्यक आहे. परंतु, पुण्यातील अनंतराव पवार इंजिनिअरिंग कॉलेजला एआयसीटीईने चालू शैक्षणिक वर्षात प्रवेशास मान्यता दिली नाही. त्यामुळे या महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश देणे अयोग्य होते. परंतु, डीटीईने या महाविद्यालयात अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश दिले.