पुरंदर तालुक्यावर भीषण दुष्काळाचे संकट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 01:46 PM2019-05-08T13:46:38+5:302019-05-08T13:49:05+5:30
तालुक्यातील साठवण तलाव कोरडे पडू लागले असून पिण्याच्या पाण्याचे साठे कमी-कमी होत चालले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड : पुरंदर तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील पाणीटंचाई उन्हाळ्यात धोक्याची पातळी ओलांडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यातील साठवण तलाव कोरडे पडू लागले असून पिण्याच्या पाण्याचे साठे कमी-कमी होत चालले आहेत. पुरंदर तालुक्यात वीर हे एकच मोठे धरण पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी बारमाही सक्षम असते. गराडे, पिलाणवाडी, माहूर ही छोटी धरणे आहेत; मात्र ऐन उन्हाळ्यात या धरणातील पाणीसाठा कमी होतो. तालुक्याचा वाढत्या विस्तार आणि लोकसंख्येच्या तुलनेने धरणातील पाणीसाठा मात्र कमी होत चालला आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय बनली आहे. पाणीटंचाईमुळे शेतीव्यवसाय धोक्यात आला आहे. शेतकऱ्यांना जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तिथे जनावरांच्या अन्नपाण्याचा तर विचार करतानादेखील शेतकऱ्यांचे मन कासावीस होत आहे. तालुक्यातील पशुधनाचा विचार करता, उपलब्ध चारा आणि पाणी यांचे प्रमाण अतिशय अत्यल्प असून तालुक्यातील पशुधनाच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू शकतो.
पुरंदर तालुक्याच्या या दुष्काळी परिस्थितीस निसर्गासोबतच प्रशासकीय हलगर्जीपणा आणि लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष हेदेखील तितकेच जबाबदार आहे. तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीत सुधारणा करण्यात प्रशासनव्यवस्था सपशेल अपयशी ठरली आहे. तालुक्यात प्रत्येक उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. या टंचाईचा सामना करून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र, शासकीय स्तरावर पुरंदर तालुक्याच्या दुष्काळी परिस्थितीबाबत कोणत्याही प्रकारचे सक्षम निर्णय घेतले गेले नाहीत.
तालुक्यातील जलसंधारणाची कामे आणि योजना या फक्त कागदावरच राहिल्या असून प्रत्यक्षात मात्र सगळी बोलाची कढी आणि बोलाचाच भात अशी स्थिती आहे. हजारो कोटी रुपयांचा निधी केवळ कागदावरच खर्च झाला आणि तालुक्यातील शेतकरी आणि जनावरे तहानलेलीच राहिली आहे. तालुक्यातील काही गावांना पाण्यासाठी बाराही महिने टँकरवरच अवलंबून राहावे लागत असूनही या गावात जलसंधारणाची कामे का केली गेली नाहीत? याचे उत्तर कोणाकडेच नाही.
पाणी आणि चारा टंचाई भीषण स्वरूप धारण करीत असूनही पुरंदर तालुक्यात दुष्काळ निवारण कक्षाची आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली गेली नाही. पुरंदची एकंदर नैसर्गिक परिस्थिती पाहता, तालुक्यातील पावसाचे प्रमाण जरी कमी असले, तरी जो काही पाऊस पडतो त्याचे पाणी साठवून भूगर्भातील जलसाठा वाढविण्यासाठी झाडे लावणे, धरणे, तलाव, नद्यांमधील गाळ काढणे या उपायांद्वारे पाणीसाठा वाढविण्याची गरज आहे.
पाणी फाउंडेशनच्या पुरंदर तालुक्यातील कामांचा मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला जात असला, तरी त्यांनी ज्या गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली, तेथे म्हणावे तितक्या प्रमाणात पाणीटंचाई कमी झाल्याचे दिसत नाही.
शासकीय कर्मचारी-अधिकारी मोठ्या हिरिरीने पाणी फाउंडेशनच्या कामात सहभागीही होतात. या सर्व उपक्रमाची जाहिरातबाजीही मोठ्या प्रमाणात केली जाते; मात्र वॉटर कप स्पर्धेत ज्या गावांना पुरस्कार मिळाले तीच गावे पाणीटंचाईचा सामना करतात आणि जेव्हा पाण्यासाठी तालुक्यातील पोखर, घेरापानवडी यासारख्या पुरस्कारविजेत्या गावांतील महिलांना मैलोन् मैल पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, त्या वेळी हा प्रश्न पडतो, की या गावांना नेमका पुरस्कार कशाबद्दल दिला गेला आणि पुरंदर तालुक्यात खरंच पाणी फाउंडेशनने काम केले का?
...........
टँकर लॉबीचे साटेलोटे
तालुक्यातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या स्वत:च्या मालकीचे टँकर आहेत; त्यामुळे दर वर्षी उन्हाळ्यात तालुक्यातील गावे ही पदाधिकारी वाटून घेतात व त्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी याच पदाधिकाºयांचे टँकर असावेत, असा आग्रहदेखील धरला जातो. उन्हाळ्यात टँकरची मागणी कायमच राहावी, याकरिता टँकरमालक व प्रशासकीय अधिकारी आणि शासन यांच्यामध्ये साटेलोटे असल्याचेही नागरिकांकडून आरोप केले जातात.
............
आरो प्लांटमालकांचे अंतर्गत सेटिंग
तालुक्यात सध्या आरो प्लांटचे पेव फुटलेले असून पावसाळ्यात भूछत्रे उगवावीत त्याप्रमाणे आरो प्लांट तालुक्यात मोठ्या प्रमाणात उभारले जात आहेत. या आरो प्लांटमधून मिळणारे पाणी कितपत शुद्ध असते, याबाबत मोठी शंका उपस्थित केली जाते. कारण बहुतांश आरो प्लांट हे विनापरवाना चालविले जात आहेत. या आरो प्लांटवर कोणतेही बंधन राहिलेले नाही. मात्र, हे पाणी फक्त थंड असते की शुद्धही असते, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो.