बारामतीच्या जिरायती भागात तीव्र टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 02:23 AM2018-12-02T02:23:15+5:302018-12-02T02:23:17+5:30
रोजचा दिवस उगवतो तो पाण्याच्या चिंतेतच. काहींना तर रोजगार बुडवून पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागते.
- रविकिरण सासवडे
बारामती : रोजचा दिवस उगवतो तो पाण्याच्या चिंतेतच. काहींना तर रोजगार बुडवून पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागते. आठ दिवसांतून एकदा मिळणाऱ्या शासकीय टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहून चालत नाही, तहान तर रोजच लागते ना...? मग मिळेल तेथून पाणी आणण्यासाठी अक्षरश: झुंबड उडते. पायपीट, मनस्ताप सहन करत एवढी मेहनत करावी लागते, ती कशीसाठी... तर घोटभर पाण्यासाठी.
बारामती तालुक्याच्या जिरायती पट्ट्याची ओळख सततचा दुष्काळी भाग म्हणून सर्वदूर झाली आहे. जिरायती पट्ट्यातील अनेक गावे मागील सहा वर्षांपासून दुष्काळाच्या झळा कमी-अधिक प्रमाणात सहन करीत आली आहेत. गावेच्या गावे आज ओस पडण्याच्या मार्गावर आहेत. बैलगाडी, दुचाकी, सायकल घेऊन अबालवृद्धसुद्धा पाण्याच्या शोधात दिवसेंदिवस भटकत असतात. जिरायती पट्ट्यातील गावांमध्ये या दिवसांत फक्त जिथे पाणी आहे अशा नळकोंडाळ्याभोवतीच काय ती गजबज दिसून येते. एरवी गावात दुष्काळासारखीच रुक्ष शांतता आहे. शासनाने मंजूर केलेल्या टँकरमधून गावातील सर्व कुटुंबांना नंबराने पाणी मिळते. आज एखाद्या कुटुंबाला पाणी मिळाले, तर पुढील आठ ते दहा दिवस तरी त्या कुटुंबाला आपल्या नंबराची प्रतीक्षा करावी लागते. मात्र तहान तर रोज लागते ना... जनावरांसाठी पोटभर आणि माणसांसाठी घोटभर पाणी मिळवण्यासाठी रोजगार बुडवून कुटुंबप्रमुख घरातील अबालवृद्ध, महिला पाण्यासाठी भांडी घेऊन पायपीट करू लागतात.
बारामती तालुक्याच्या जिरायती पट्ट्यातील मुर्टी, तरडोली, जळगाव सुपे, उंडवडी, कडेपठार, काºहाटी अशा अनेक दुष्काळी गावांमध्ये जनजीवन पाण्याभोवतीच फिरू लागले आहे. एक-दोन नव्हे तब्बल सहा वर्षे टंचाईशी सामना करावा लागत आहे. टँकरसाठी प्रस्ताव दाखल केले. अधिकाºयांनी आढावा बैठका घेतल्या किंवा पुढाºयांनी दौरे केले म्हणून घसा ओला होत नाही. कारण टँकरमधून येणारे पाणी मिळवण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो. काही धनदांडगे अरेरावी करतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला पुन्हा पाण्याची प्रतीक्षाच करावी लागते, असे येथील ग्रामस्थ नाव न छापण्याच्या अटीवर सांगतात. कारण त्यांना भीती आहे, ती धनदांडग्यांची आणि गाव पुढाºयांची. अनेक पाणी योजना आल्या. त्याधून पाणी देण्याची आश्वासनेदेखील मिळाली. परंतु प्रत्यक्षात या पाणी योजनांचे पाणी अद्यापही दुष्काळी पट्ट्यात पोहचलेच नसल्याचे वास्तव आहे.
मागील आठवड्यात तहसीलदारांनी सुपे येथे दुष्काळ आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत जानाई-शिरसाईच्या पाण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती.
मागील महिन्यात पशूसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्येदेखील ही मागणी करण्यात आली होती. याबाबत खडकवासला धरण प्रशासनाशी बोलणेही झाले होते. मात्र जलसंपदा मंत्रालयाकडून आदेश आल्याशिवाय जानाई-शिरसाइसाठी पाणी सोडण्यास आपण असमर्थ आहोत, असे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे जानाई-शिरसाईच्या पाण्याबाबत अनिश्चितता वाढली आहे.
>आदर्श ग्राम पाण्यासाठी तहानलेले...
खासदार आदर्श ग्राम योजनेत सहभागी झालेल्या मुर्टी गावामध्ये अद्यापही पाण्यासाठी दाहीदिशा कराव्या लागत आहेत. राज्यसभा खासदार डी. पी. त्रिपाठी यांनी मुर्टी गाव दत्तक घेतले होते. या योजनेच्या माध्यमातून गावामध्ये चकाचक सिमेंटचे रस्ते झाले, पथदिवे आले, जलसंधारणाची कामे झाली. मात्र मगरवाडी येथून येथील ११ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेची फाईल मंत्रालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
गावाला प्यायला पाणी नाही. शासकीय टँकरचे पाणी अपुरे पडते. त्यामुळे खासगी टँकरमधून ५० रुपयाला एक बॅरल पाणी विकत घ्यावे लागते. सध्या पुरंदरे मळा येथील पाणीपुरवठा योजनेतून १० दिवसांतून एकदाच गावात पाणी येते. गाव खासदारांनी दत्तक घेतले तरी येथील मूळ समस्या सोडवण्यात अपयश आल्याचे स्पष्ट होत आहे. येथील ओव्हाळाचा मळा, तांबेवस्ती येथे एका टँकरच्या माध्यमातून दररोज तीन खेपा केल्या जात आहेत.
>रोजगारासाठी स्थलांतर...
जिरायती भागातील अनेक तरुणांनी रोजगाराच्या शोधात स्थलांतर केले आहे. पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे चारा महागला आहे. चारा महागल्याने दूध व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे. परिणामी जनावरे बाजारामध्ये कमी किमतीत विकावी लागत आहेत. आलेल्या पैशातून येथील युवक बारामती येथील एमआयडीसी, पुणे, पिंपरी चिंचवड येथे रोजगाराच्या शोधात फिरत आहेत.
>पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी
होतोय संघर्ष
चाºयासाठी अजूनतरी कोणताही मागणीचा प्रस्ताव आला नाही. भविष्यात असे प्रस्ताव दाखल होतील. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी केली आहे.
- हनुमंत पाटील,
तहसीलदार, बारामती
मुर्टी गावासाठी प्रस्तावित ११ कोटींची पाणी योजनेची फाईल मंत्रालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या योजनेसाठी पाटबंधारे विभागाने मगरवाडी परिसरात कालव्याच्या शेजारी असणारी ५ एकर जागा देण्याचे मान्य केले आहे. ही योजना तातडीने मंजूर झाल्यास मुर्टीचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. - लालासाहेब राजपुरे,
उपसरपंच, मुर्टी , ता. बारामती
सध्या तलावात असणाºया पाण्यावर चारापीक घेतले आहे. मात्र तलावातील पाण्याची पातळी गाळाबरोबर गेली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात पाणी पूर्णपणे संपणार आहे. सध्या शेतात उभा असलेला पीकचारा म्हणून महिनाभर पुरेल. मात्र पुढील दोन महिन्यांत जनावरे जगविणे कठीण होणार आहे. - सागर जगताप,
शेतकरी, ढाकाळे, ता. बारामती