दोन महिन्यांपासून तीव्र टंचाई
By admin | Published: May 11, 2015 05:57 AM2015-05-11T05:57:03+5:302015-05-11T05:57:19+5:30
नीरा देवघर धरणाच्या काठावर असलेल्या निवंगण गावात मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. टॅँकरची मागणी करुन एक महिना झाला.
भोर : नीरा देवघर धरणाच्या काठावर असलेल्या निवंगण गावात मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. टॅँकरची मागणी करुन एक महिना झाला. त्यानंतर एकदाच टॅँकर आला होता. यामुळे महिलांची पाण्यासाठी वणवण सुरु असून, अर्धा किलोमीटरवर असलेल्या शिवकालीन साठवण विहिरीवरुन पाणी आणावे लागत आहे. तसेच येथील पाणी खराब झाले असून, हेच दूषित पाणी लोकांना प्यावे लागत असून, ६ ते ७ हांडे वाटून घेतात. जनावरांना पाण्यासाठी ६ किलोमीटरवर असलेल्या नीरा देवघर धरणावर घेऊन जावे लागते. याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने गावातील महिलांसह ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत.
नीरा देवघर धरणाच्या काठावर सुमारे ६०० ते ७०० लोकवस्तीचे निवंगण हे गाव असून, दोन वाड्या आहेत. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून गावात पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे रायरेश्वर किल्ल्यावरुन उताराची नळ पाणीपुरवठा योजना २० वर्षांपूर्वी करण्यात आली आहे; मात्र गावाची लोकसंख्या वाढल्याने व दिवसेंदिवस पाणी कमीकमी होत गेल्याने दर उन्हाळ्यात सदरच्या योजनेला पाणी कमी पडत आहे.
सन २००७मध्ये गावापासून एक किलोमीटर रिंगरोडजवळच्या शेतात शिवकालीन साठवण विहीर बांधण्यात आली आहे; मात्र सदरच्या विहिरीलाही मार्च महिन्यापर्यंतच पाणी असते, नंतर पाणी कमीकमी होत जाऊन खराब होत जाते. त्यामुळे टॅँकरची मागणी करावी लागत असल्याचे सरपंच किसन दिघे व आनंदा दिघे यांनी सांगितले.
या वेळी टॅँकरची मागणी करुन एक महिना झाला; मात्र गावात फक्त ४ व ७ मे रोजी दोन वेळा अर्धा अर्धा टॅँकर गावात आला. त्यानंतर टॅँकर फिरकलाच नसल्याचे प्रवीण दिघे व अंकुश दिघे यांनी सांगितले. (वार्ताहर)
दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात
दरवर्षी उन्हाळ्यात महिलांना शिवकालीन विहिरीवरून पायपीट करून पाणी आणावे लागते. सदरचे पाणी कमी झाल्याने खराब झाले असून, दूषित झाले आहे; मात्र गावात इतरत्र कुठेच पाण्याची सोय नसल्याने हेच पाणी प्यावे लागते. त्यामुळे नागरिक आजारी पडण्याची शक्यता आहे. लवकरात लवकर टँकर सुरू करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.