टंचाईच्या तीव्र झळा; १० दिवसांनी एकदा होतोय पाणीपुरवठा, भोर तालुक्यातील चिंताजनक परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 15:54 IST2025-03-31T15:52:53+5:302025-03-31T15:54:10+5:30

भोर पंचायत समितीकडे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव दाखल करूनही टँकर मंजूर झाला नाही, सध्या खासगी टँकरने विकत पाणी घ्यावे लागते

Severe shortage Water supply is happening once in ten days worrying situation in Bhor taluka | टंचाईच्या तीव्र झळा; १० दिवसांनी एकदा होतोय पाणीपुरवठा, भोर तालुक्यातील चिंताजनक परिस्थिती

टंचाईच्या तीव्र झळा; १० दिवसांनी एकदा होतोय पाणीपुरवठा, भोर तालुक्यातील चिंताजनक परिस्थिती

भोर : करंदी खे. बा गावच्या नळपाणी पुरवठा योजनेच्या विहिरीला पाणीच नसल्यामुळे तब्बल १० दिवसांनी एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. भोर पंचायत समितीकडे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे. मात्र, अद्याप टँकर मंजूर झालेला नाही सध्या खासगी टँकरने विकत पाणी घ्यावे लागत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहे.

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या करंदी खे.बा गावची लोकसंख्या १६९८ आहे. सन २०२०/२१ साली गावाशेजारी विहिर काढुन नळपाणी पुरवठा योजना झाली होती. मात्र, विहिराला पाणी कमी पडत गेले आणी दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत गेली. सध्या विहिरीला पाणीच नसल्यामुळे तब्बल दहा दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. शिवाय ओढे-नाले आटले असून, जनावरांनाही पाणी नाही. त्यामुळे नागरिकांचे पाण्या वाचून हाल सुरू आहेत. भोर पंचायत समितीकडे टँकरने पाणीपुरवठा करावा, म्हणून प्रस्ताव सादर केलेला आहे. मात्र, सदरचा प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे पाठवला जाणार, त्यानंतर स्थळ पाहणी करून टँकरला मंजुरी मिळणार, त्याला अजून किती दिवस जातील सांगता येत नाही. तोपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

दरम्यान जलजीवन मिशन योजनेतून सुमारे दोन कोटी रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. पुरंधर तालुक्यातील देवडी गावाजवळ असलेल्या एमआय टँकजवळ विहीर काढून पाइपलाइनने पाणीपुरवठा होणार आहे. त्याला पाटबंधारे विभागाने मंजुरी दिली आहे, मात्र सदर योजनेची विहीर ते टाकीदरम्यान पाइपलाइन वन विभागाच्या हद्दीतून जात असल्यामुळे सदरच्या योजनेचे काम थांबले आहे. ग्रामपंचायतीचा ना हरकत प्रमाणात घेऊन सदरचा प्रस्ताव वन विभागाला पाठवणार असल्याचे पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

वन विभागाकडून मंजुरी कधी मिळणार आणि काम पूर्ण होऊन गावात पाणी कधी येणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गावात झालेल्या पूर्वीच्या नळपाणी पुरवठा योजनेला २५ वर्षे झाली असून, लोकसंख्या वाढली आहे. विहिरीला पाणी कमी पडल्यामुळे सध्या गावाला दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. यामुळे भोर पंचायत समितीकडे टँकर मागणीचा प्रस्ताव दिला आहे, मात्र शासनाचाही टँकर मंजूर झालेला नाही. त्यामुळे एका खासगी कंपनीचा टँकर घेऊन त्यात डिझेलचा आणि पाणी भरण्याचा खर्च स्वत: करत असून, दररोज दोन टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, हा पाणीपुरवठा पुरेसा नसल्याने पंचायत समितीने टँकर सुरू करावा.  - नवनाथ गायकवाड, सरपंच करंदी खे.बा

करंदी खे. बा गावात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई असून, भोर पंचायत समितीने त्वरीत टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा. यंदा नेहमीपेक्षा जास्त उन्हाळा जाणवत आहे. त्यामुळे पाणी बचत करून पिण्यासाठी वापरण्यासाठी गरज आहे. नाही तर यावेळी दुष्काळ अधिक प्रमाणात असणार आहे. नागरिकांनी पाण्याची बचत करावी. भाटघर व निरादेवघर धरणातून खाली सोडलेले पाणी हे येथील नागरिकांना पिण्यासाठी राहील, अशा पद्धतीने सोडण्यात यावे. - अमोल पांगारे, सदस्य जिल्हा नियोजन समिती पुणे

 

Web Title: Severe shortage Water supply is happening once in ten days worrying situation in Bhor taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.