भरधाव टेम्पोने उडवल्याने गंभीर जखमी; तिच्या तत्परतेमुळे वाचले पादचाऱ्याचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 12:35 IST2023-05-08T12:35:03+5:302023-05-08T12:35:46+5:30
''अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळाल्यास त्यांचे प्राण वाचतात, हेच आपले समाजकार्य असेल''

भरधाव टेम्पोने उडवल्याने गंभीर जखमी; तिच्या तत्परतेमुळे वाचले पादचाऱ्याचे प्राण
धनकवडी : कॅब पकडण्यासाठी धनकवडीतील कानिफनाथ चाैकात आलेल्या पादचाऱ्याला एका भरधाव टेम्पाेने उडवले. यात गंभीर जखमी हाेऊन रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या आंबेगाव पठार येथील आदिनाथ शिरसाठ ( वय ४७, रा. आंबेगाव पठार) यांचे एका अभियंता तरुणीच्या तत्परतेमुळे प्राण वाचले. त्यामुळे अपूर्वा ठाकरे या तरुणीचे परिसरात काैतुक हाेत आहे.
शिरसाठ हे खासगी कंपनीत नोकरी करतात. आंबेगाव पठार ते कानिफनाथ चौकदरम्यान बेकायदा पार्किंगमुळे नेहमीप्रमाणे शनिवारीही चालत ते कॅब पकडण्यासाठी जात हाेते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या टेम्पाेने धडक दिली. त्यात शिरसाठ गंभीर जखमी झाले. त्याचवेळी शंकर महाराज मठात सकाळी आरतीला जाणाऱ्या अभियंता अपूर्वा ठाकरे यांनी थांबून रुग्णवाहिका आणि पोलिसांना तत्काळ कळवले. रुग्णवाहिका लवकर येत नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी तेथील टेम्पाेमधून शिरसाठ यांना घेेऊन जात त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. ज्यामुळे शिरसाठ यांच्यावर वेळेत उपचार मिळाले आणि त्यांचे प्राण वाचले. याविषयी अपूर्वा म्हणाली, अपघात घडताे, तेव्हा लोक जमा होतात; मात्र आपत्कालीन स्थितीत काय करायचं याची माहिती नसल्यामुळे अथवा झंजट नको म्हणून पुढाकार न घेणाऱ्यामुळे अनेक जण जीव गमावतात. गंभीर जखमींना वेळेत उपचार मिळावेत यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढे आले पाहिजे त्याचवेळी पोलिस आणि रुग्णालयांनी अशा समाजसेवकांना सहकार्य केलं पाहिजे, तरच नागरिक मदतीला येतील. रस्त्याकडेला बेकायदा पार्किंगवर कारवाई झाली पाहिजे हे आवर्जून ठाकरे यांनी सांगितले.