सांडपाण्याच्या वाहिन्या बदलून परिसर केला मैलामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:14 AM2021-02-17T04:14:42+5:302021-02-17T04:14:42+5:30
गेल्या काही वर्षांपासून पावसाळा असो वा उन्हाळा या परिसरात मैलामिश्रित पाणी साचून दुर्गंधी पसरणे नित्याचेच होते. दुरुस्तीद्वारे महापालिकेकडून केवळ ...
गेल्या काही वर्षांपासून पावसाळा असो वा उन्हाळा या परिसरात मैलामिश्रित पाणी साचून दुर्गंधी पसरणे नित्याचेच होते. दुरुस्तीद्वारे महापालिकेकडून केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात होती. त्यातून या परिसरात पुन्हा-पुन्हा मैलामिश्रित पाणी रस्त्यावर येत होते. त्यामुळे सायबर पार्क, प्रभात सोसायटी, ओंमकार अपार्टमेंट, चैतन्यनगर सोसायटी यासह परिसरातील नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत होता. ही बाब नगरसेविका अश्विनी भागवत यांनी गांभीर्याने घेऊन आठ दिवसांपूर्वी ड्रेनेज पाईपलाईनच बदलण्याचे काम हाती घेतले. त्यानुसार दहा लाख रुपयांचे तातडीचे काम आयुक्तांकडून मंजूर करून घेतले. त्यानुसार कामासही सुरुवात केली. दोन तीन ठिकाणी चेंबरचे काम पूर्ण करत नवीन पाईपलाईन टाकण्यात आली. त्यात १५ दिवसांचे काम ८ दिवसांत पूर्ण केले. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
चैतन्यनगर परिसरात मैलामिश्रित पाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरत होती. त्यामुळे ये-जा करणारे नागरिक त्रासले होते. ही बाब ओळखून अनेक वर्षांपूर्वीची जुनी ड्रेनेज पाईपलाईन बदलून नवीन टाकण्यात आली. त्यामुळे हा परिसर मैलामुक्त झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.- अश्विनी भागवत - नगरसेविका