पर्वती दर्शनमध्ये नागरिकांच्या घरात मैलापाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:11 AM2021-05-20T04:11:46+5:302021-05-20T04:11:46+5:30
पुणे : मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे झोपडपट्ट्या तसेच चाळींमधील घरांमध्ये गटाराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांनी ...
पुणे : मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे झोपडपट्ट्या तसेच चाळींमधील घरांमध्ये गटाराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांनी तक्रारी करूनही गटारांची स्वच्छता ना झाल्याने मैलापाणी नागरिकांच्या घरात शिरल्याचा प्रकार पर्वती दर्शन येथील साईबाबा वसाहतीमध्ये घडला.
गटारी तसेच मैलापाणी वाहिन्या जुन्या झाल्या असून त्या बदलण्याची आवश्यकता आहे. या गटारांमधील गाळ काढणे आणि पाणी वाहून जाण्यासाठी त्या मोकळ्या करणे आवश्यक आहे. परंतु, पालिकेच्या दुर्लक्षामुळे शौचालयाच्या मैलापाणी वाहिनी व गटारातील घाण तसेच दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात घुसले.
वारंवार तक्रार करून देखील अधिकाऱ्यांनी तसेच क्षेत्रीय कार्यालयाने दुर्लक्ष केले आहे. याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केल्यावर अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे नागरिकांनी सांगितले. मागील दोन आठवड्यांपासून चेंबर साफ देण्याची विनंती नागरिकांकडून अधिकाऱ्यांकडे केली जात आहे. चेंबर साफ करणारे कर्मचारीसुद्धा नागरिकांना जुमानत नसल्याचे चित्र आहे. या परिसरातील मुकादम, आरोग्य निरीक्षक मोहिते यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते गणेश घोलप यांनी सांगितले. सध्या आमच्या मागे खूप कामे आहेत. तुमच्या समस्येचे नंतर बघू अशी उत्तरे दिली जात आहेत.
कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. परंतु, घरातच मैलापाणी घुसल्याने नागरिकांना घरात बसणेही अवघड झाले आहे. घरात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आहेत. या प्रकारामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घाण पाण्यामुळे नागरिकांना आणखीन दुसऱ्याच आजाराला सामोरे जावे लागेल.
(फोटो : जेएम एडिटवर)