पाण्याच्या स्रोतांमध्ये मैलामिश्रित सांडपाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:17 AM2021-03-13T04:17:59+5:302021-03-13T04:17:59+5:30
चाकण: शहरातील, तसेच आसपासच्या परिसरातील मैलामिश्रित सांडपाणी थेट पााण्याच्या स्त्रोतांमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे चाकणमधील ओढ्याचे पाणी फेसाळले असून ...
चाकण: शहरातील, तसेच आसपासच्या परिसरातील मैलामिश्रित सांडपाणी थेट पााण्याच्या स्त्रोतांमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे चाकणमधील ओढ्याचे पाणी फेसाळले असून हेच पाणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भीमा नदीला जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्या प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.
चाकण नगरपरिषदेच्या वतीने सध्या शहरात स्वछता मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातून जाणाऱ्या या ओढ्यातील गा मिश्रित कचरा काढण्यात येत आहे.त्यामुळे सांडपाणी वाहून जाते आहे, मात्र नगरपरिषदेच्या हद्दीतील पठारवाडी येथील याच ओढ्यात कचरा साठल्याने दुर्गंधी सुटली आहे. सांडपाण्यावर फेस तयार झाला आहे. हेच दुर्गंधीयुक्त फेसाळलेले सांडपाणी पुढे भामा नदीला जाऊन मिळत आहे. राक्षेवाडी,पठारवाडी या भागासह पुढे काळूस येथील अनेक नागरिक हे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी वापर करतात, त्यामुळे हे पाणी पिणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नैसर्गिक ओढे, नदी आणि नाले हे पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत आहेत. मात्र, ते स्वच्छ ठेवण्याची मनोवृत्ती नसल्यामुळे त्यांची गटारे बनल्याचे चित्र चाकण पालिकेच्या हद्दीत व परिसरात हमखास पाहावयास मिळते. अनेक लोकांनी या ओढ्यात सांडपाणी व मैला मिश्रीत पाणी सोडले आहे.तसेच मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्या ओढ्यात आल्याने पाणी पुढे जात नाही. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
एकेकाळी पावसाचे पाणी वाहून नदीकडे नेणाऱ्या या जलस्रोताला पूर येत होता. हे चित्र आता झपाट्याने बदलत असून गृहप्रकल्पांचे सांडपाणी आणि मैला वाहत असलेले सांडपाणी येथून वाहत आहे.चाकण नगरपरिषदेने या संदर्भात योग्य ते पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.या सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी इतर वापरासाठी उपयोगात आणले जाऊ शकते.असा प्रकल्प राबवणे गरजेचे आहे.
भूजल प्रदूषणाचा विळखा
चाकण भागात साधारणत: २० ते २५ वर्षांपूर्वी कोणत्याही विहिरीचे पाणी बिनधास्त पिता येत होते, तेच हातपंपाच्या पाण्याबाबतही होते. उघड्या वाहणाऱ्या पाण्याबाबत काही शंका असायच्या, पण भूजलाबाबत शंका घ्यायचे कारण नव्हते. त्याच्या दर्जासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ किंवा इतर कोणत्याही संस्थेच्या अहवालाची गरजही नव्हती. आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. विहिरींना व हातपंपाना दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असून भूजल प्रदूषणाच्या समस्याही या भागात निर्माण झाल्या आहेत.
११चाकण
पठारवाडी येथील सांडपाणी वाहून जात असताना त्यावर आलेला फेस.