पुण्यात लैंगिक प्रशिक्षण देण्याच्या ‘सेक्स तंत्र’ जाहिरातीने उडाली खळबळ; काय आहे नेमकं प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 08:54 AM2022-09-16T08:54:20+5:302022-09-16T08:57:17+5:30
जाहिरातीत १ ते ३ ऑक्टोबरदरम्यान ३ दिवस २ रात्र लैंगिक प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविला जाणार असल्याचे नमूद...
पुणे : सोशल मीडियावर ‘सेक्स तंत्र’ नावाने नवरात्र स्पेशल कॅम्पची जाहिरात झळकल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली. जाहिरातीत १ ते ३ ऑक्टोबरदरम्यान ३ दिवस २ रात्र लैंगिक प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविला जाणार असल्याचे नमूद केल्याने सर्वत्र याच जाहिरातीची चर्चा रंगली आहे.
सत्यम् शिवम् सुंदरम् फाउंडेशनतर्फे या प्रशिक्षण कॅम्पची जाहिरात करण्यात आली आहे. यात अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन नोंदणीसाठी एक क्रमांक दिला असून, यासाठी प्रति व्यक्तीकडून १५ हजार रुपये शुल्क आकारले जाईल. तसेच यात वैदिक सेक्स तंत्रासह चक्र ॲक्टिव्हेशन, ओशो मेडिएशन यासारख्या विविध गोष्टी शिकविल्या जाणार असल्याचे नमूद केले आहे.
व्हॉट्सॲपसाठी अ101 असा कोडही देण्यात आला आहे. हा फसवणुकीचा नवा फंडा तर नाही ना? अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. याचा अजूनही उलगडा झालेला नाही. याविषयी माहिती देताना सायबरचे सहायक पोलीस निरीक्षक कुमार घाडगे म्हणाले, सोशल मीडियावर ही जाहिरात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर आम्ही जाहिरातीतील नमूद क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु क्रमांक बंद येत होता. त्यामुळे आम्ही कंपनीला मेल पाठविला आहे. त्याचे उत्तर आल्यानंतर संपूर्ण माहिती कळू शकेल. मात्र, यासंदर्भात आमच्याकडे अद्यापही कुणाचा तक्रार अर्ज आलेला नाही.