अल्पवयीन मुलीला अश्लील छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल करत अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 02:22 PM2020-03-07T14:22:56+5:302020-03-07T14:24:05+5:30
मी बोलावल्यावर तु येत जा, नाही तर तुझी अश्लिल छायाचित्रे तुझ्या घरच्यांना दाखवेल
बारामती : महाविद्यालयीन १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अश्लील छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.याप्रकरणी आरोपी युवकासह त्याला सहाय्य करणाऱ्या आईच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी ऋषिकेश दत्तात्रय पासलकर (रा. पासलकरवस्ती, दौंड) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील १७ वर्षीय मुलगी बारामती तालुक्यात वास्तव्या आहे. तिने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार १३ जुलै २०१९ रोजी आरोपीने फिर्यादीची इच्छा नसताना आपण मित्राच्या घरी जावू ,असे सांगत तिला दुचाकीवर बसवले.त्यानंतर बारामती तालूक्यातुन दौंड तालुक्यातील पासलकरवस्ती येथे नेवुन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिच्यासोबत अश्लील छायाचित्रे काढली. मी बोलावल्यावर तु येत जा, नाही तर तुझी अश्लिल छायाचित्रे तुझ्या घरच्यांना दाखवेल अशी धमकी तो वारंवार पीडितेला देत होता. त्यानंतर ११ ऑ क्टोबर २०१९ रोजी त्याने पुन्हा धमकावत तिला दुचाकीवरुन पासलकरवस्ती येथील घरी नेले. घरातील बेडरुममध्ये तो तिला घेवून गेला. यावेळी त्याच्या आईने बाहेरून दरवाजाची कडी लावली. त्याने तेथे फियार्दीच्या इच्छेविरुद्ध पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. फियार्दीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीच्या आईने दरवाजा उघडला नाही. या प्रकरणाची वाच्यता केल्यास तुझी अश्लील छायाचित्रे सगळीकडे ह्यव्हायरलह्ण करण्याची धमकी देत त्याने तिला बारामती बस स्थानकावर आणून सोडले. छायाचित्रे दाखविण्याची धमकी देत त्याच्याकडून ब्लॅकमेल केले जात असल्याने फिर्यादि अल्पवयीन मुलीने २८ फेब्रुवारी रोजी कुटुंबियांना ही बाब सांगितली. त्यानंतर ५ मार्च रोजी याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. आरोपींविरुद्ध पोलिसांनी बलात्कार, अपहरण तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी याप्रकरणी आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचे सांगितले.