Pune: बालसुधारगृहात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; भुलीचे इंजेक्शन देऊन केले कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 11:20 AM2023-07-04T11:20:39+5:302023-07-04T11:21:17+5:30
याबाबत पीडित मुलाचे ४२ वर्षीय आईने आरोपींविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली...
पुणे : एका गुन्ह्यात बालसुधारगृहात दाखल झालेल्या १६ वर्षीय मुलाला उपचारांसाठी येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी आरोपीने संबंधित मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडिताला भुलीचे इंजेक्शन देऊन अत्याचारास मदत केल्याप्रकरणी नर्ससह पाचजणांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित मुलाचे ४२ वर्षीय आईने आरोपींविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. हा प्रकार ३० मे ते २६ जून २०२३ यादरम्यान येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलाला खेड पोलिसांनी एका खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात येरवडा बालनिरीक्षणगृहात ठेवले हाेते. तेथून त्याला मनाेरुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्याठिकाणी आरोपी अनिकेत गाेखले (वय २५) याच्यावरदेखील उपचार करण्यात येत होते. अनिकेत गाेखले याने या मुलावर रुग्णालयात वारंवार अनैसर्गिक संबंध ठेवले. तसेच त्याला हा प्रकार कोणास काही सांगायचा नाही अशी धमकी दिली.
त्यानंतर बरॅकमध्ये अल्पवयीन मुलगा आराम करीत असतानाही मनोरुग्णालयात काम करणारे अनाेळखी सिस्टर व चार गार्ड यांनी त्याला भुलीचे इंजेक्शन दिले. उपचारांनंतर पीडित मुलास रुग्णालयातून घरी साेडण्यात आले हाेते. त्यानंतर त्याच्या आईने त्याला शाळेत प्रवेश घेण्यासाठी काेल्हापूर येथे नेले. त्यावेळी त्याचा डावा हात सारखा दुखत असल्याचे ताे सांगू लागला. त्यामुळे डाॅक्टरांकडे जाऊन त्याने तपासणी करीत, डाॅक्टरांच्या सल्ल्याने हाताचा एक्स-रे काढला. त्यावेळी त्याच्या हाताला तब्बल १८ ठिकाणी सुया टाेचल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रादेशिक रुग्णालयातील सिस्टर व चार गार्ड यांनी त्याला भुलीचे इंजेक्शन दिल्याने त्याच्या हाताला दुखापत झाल्याने आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास येरवडा पाेलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गाताडे हे करीत आहेत.