वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांकडूनच पहिलीच्या मुलाचे लैंगिक शोषण; पुण्यातील नामवंत खासगी शाळेतील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 01:19 PM2023-10-10T13:19:27+5:302023-10-10T13:19:43+5:30
लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार (पोक्सो) विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापिकेविरुद्धही गुन्हा दाखल
पुणे / सहकारनगर : सहकारनगर येथील एका नामवंत खासगी शाळेतील पहिलीतील विद्यार्थ्याचे वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी लैंगिक शोषण केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. याप्रकरणी पालकांनी शाळा प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. याप्रकरणी रॅगिंग कायद्यान्वये, तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार (पोक्सो) विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापिकेविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या शाळेला आज सुटी जाहीर करण्यात आली आहे.
याबाबत एका महिलेने पर्वती पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांचा सहा वर्षांचा मुलगा या शाळेत पहिलीत शिकतो. दोन ते तीन दिवसांपासून शाळेतील वरच्या वर्गातील एक विद्यार्थी आणि त्याचे मित्र पहिलीतील मुलाला त्रास देत होते. त्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होते. कोणाला सांगितल्यास जिवे मारू, अशी धमकी दिली होती. त्यामुळे मुलगा घाबरला होता. याबाबतची माहिती मुख्याध्यापिकांना देण्यात आली. मात्र, त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असे तक्रारदार महिलेने म्हटले आहे. त्यामुळे मुलाची आई, अन्य पालक व सामजिक कार्यकर्त्यांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला. मुलाच्या आईने याबाबत तक्रार दिल्यानंतर बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंग करण्यास मनाई अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिवनंदा जाधव करीत आहेत.
दरम्यान, आमच्या शाळेबद्दल अफवा पसरविल्या जात आहेत. प्रकरण पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आमचा माध्यमिक विभाग अतिशय कार्यक्षमतेने काम करीत असून, विद्यार्थ्यांची काळजी घेत आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो की, अफवांवर विश्वास ठेवू नका. आम्हाला सहकार्य करा, असा मेसेज शाळा प्रशासनाने पालकांना पाठविला आहे.