Pune Crime: खोट्या डॉक्टरकडून महिलेवर लैंगिक अत्याचार; अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याचीही दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 10:37 IST2021-10-28T10:37:02+5:302021-10-28T10:37:28+5:30
एका व्यक्तीने डॉक्टर असल्याचे भासवून २९ वर्षीय विवाहितेचा विश्वास संपादन केला. आणि वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले

Pune Crime: खोट्या डॉक्टरकडून महिलेवर लैंगिक अत्याचार; अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याचीही दिली धमकी
पुणे : पुण्यातील विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतुन महिला अत्याचाराचा एक प्रकार उघडकीस आला. एका व्यक्तीने डॉक्टर असल्याचे भासवून २९ वर्षीय विवाहितेचा विश्वास संपादन केला. आणि वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच आपले म्हणणे ऐकले नाही तर अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
नायक रुद्रा रमेशराव उर्फ किशन रमेशराव जाधव (वय ३३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विमानतळ पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. २९ वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली. हा प्रकार मार्च २०२१ ते ऑक्टोबर २०१९ या काळात वेळोवेळी घडला.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपीने फिर्यादी महिलाडॉक्टर असून ससून हॉस्पिटल येथे नोकरीला असल्याचे सांगितले. स्वतःचे नर्सिंग कॉलेज आणि फार्मसी कॉलेज असल्याचे सांगून विमाननगर परिसरातील फ्लॅटमध्ये फिर्यादी महिलेला बोलावून घेतले. तिथे त्याने या महिलेला खोटे आयकार्ड आणि वैद्यकीय डिग्रीचे बनावट कागदपत्रे दाखवून ती खरी असल्याचे भासवले. त्यानंतर फिर्यादीच्या कौटुंबिक वादाचा फायदा घेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तिच्यासोबत घरामध्ये जबरदस्तीने लग्नही केले. त्यानंतर फिर्यादीच्या नातेवाईकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून १६ लाख ६५ रुपये घेऊन फसवणूक केली.
दरम्यान काही काळानंतर फिर्यादीला आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने आरोपीला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आरोपीने तु माझे ऐकले नाही तर अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या पतीला जीवे मारण्याची आणि नोकरी लावण्यासाठी घेतलेल्या पैशाच्या व्यवहारांमध्ये अडकवण्याची धमकी दिली. सुरुवातीच्या काही काळात बदनामी होईल या भीतीने फिर्यादीने तक्रार दिली नव्हती. परंतु आरोपीकडून होणारा त्रास असह्य झाल्याने त्यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.