पुणे महानगरपालिकेत नोकरी लावण्याच्या आणि लग्नाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार; 2 वर्षानंतर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 03:32 PM2023-01-01T15:32:27+5:302023-01-01T15:32:34+5:30
लग्नाचे आमिष दाखवून डेक्कन पवेलियन हॉटेल या ठिकाणी बोलावून घेत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले
पुणे/किरण शिंदे : पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने एका विवाहित महिलेवर वारंवार बलात्कार करून तिची आर्थिक फसवणूक करण्यात आली. जानेवारी 2019 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत हा सर्व प्रकार घडला. कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी संतोष दत्तात्रय पवार (रा. मु पो. मेढा, जावळी, सातारा) याच्याविरुद्ध बलात्कार आणि अनैसर्गिक संबंध केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 34 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित महिला ही पुण्याची आहे. तर आरोपी सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहे. आरोपीने फिर्यादीला पुणे महानगरपालिकेत नोकरी लावतो असे सांगून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला वेगवेगळी आमिष दाखवून आठ लाख 68 हजार रुपये रोख रक्कम तिच्याकडून घेतले. दरम्यान फिर्यादीच्या असहायतेचा आणि घरी झालेल्या वादाचा गैरफायदा ही आरोपीने घेतला. तिला लग्नाचे आमिष दाखवून डेक्कन पवेलियन हॉटेल या ठिकाणी बोलावून घेत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले.
2019 ते 2021 या सर्व कालावधीत हा सर्व प्रकार घडत होता. आरोपीने या कालावधीत फिर्यादीला नोकरी न लावता तसेच तिच्यासोबत लग्न न करता तिची आर्थिक फसवणूक केली. कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.