वयात येण्याआधीच पोरा-पोरींचे लैंगिक चाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:08 AM2021-07-08T04:08:50+5:302021-07-08T04:08:50+5:30
प्रज्ञा सिंग-केळकर पुणे : कोरोनाकाळात वाढलेला स्क्रीन टाइम अनेक समस्यांना आमंत्रण देत आहे. दिवसातला जास्तीत जास्त वेळ मोबाईल हातात ...
प्रज्ञा सिंग-केळकर
पुणे : कोरोनाकाळात वाढलेला स्क्रीन टाइम अनेक समस्यांना आमंत्रण देत आहे. दिवसातला जास्तीत जास्त वेळ मोबाईल हातात आल्याने लहान मुलांमध्येही पॉर्न पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ११-१२ वर्षांच्या मुलांमध्ये लैंगिक सक्रियता वाढत चालली आहे. कमी वयात हस्तमैथुनसारख्या क्रियांमधून लैंगिक सक्रियता आल्याने मुलामुलींवर दूरगामी मानसिक आणि शारीरिक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे पालकांनी वेळीच सतर्क होण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. शिवाय, पॉर्न कंटेन्ट शेअर करणे हा कायद्याने गुन्हा आहे, याबाबतही मुलांना सजग करणे आवश्यक बनले आहे.
पॉर्न व्हिडिओ, त्यातील लैंगिक दृश्यांचे मुलांमधील आकर्षण वाढत आहे. या विषयांवर समवयस्क मित्र-मैत्रिणींमध्ये चर्चाही रंगतात. यातून बऱ्याचदा चुकीची माहिती आणि लैंगिकतेबद्दलचे गैरसमज पसरण्याचीच शक्यता अधिक असते. सध्या ऑनलाईन शाळा सुरू असल्याने मुले बराच वेळ स्क्रीनसमोर असतात. स्मार्टफोन हातात आल्यानंतर मुलांचा पॉर्नच्या विश्वातील प्रवेश सहज होतो.
पॉर्न व्हिडिओत दाखवली जाणारी दृश्ये म्हणजेच खरे लैंगिक सुख असा त्यांचा समज होतो. यातून मुले-मुली हस्तमैथुनाकडे वळतात. लैंगिकतज्ज्ञांच्या मते, पूर्वी १६-१८ वर्षे वयोगटातील मुले-मुली लैंगिकदृष्ट्या सक्रिय होत. त्यालाच ‘वयात येणे’ असे म्हटले जायचे. पण आता वयाचे हे प्रमाण ११-१२ वर्षांपर्यंत खाली घसरले आहे. ही धोक्याची घंटा आहे. या वयोगटातल्या मित्र-मैत्रिणींमध्ये, नात्यातल्या मुलामुलींमध्येही प्रत्यक्ष लैंगिक संबंध निर्माण झाल्याच्या घटना अलीकडच्या काळात उघड होऊ लागल्या आहेत. यातून बारा-तेरा वर्षांच्या मुली गर्भवती झाल्याचेही आढळून आले. त्यामुळे मोबाईलचा वापर नेमका होतो कशासाठी यावर पालकांनी नियंत्रण ठेवणे गरजेचे झाले आहे.
चौकट
मुलामुलींच्या हातातील मोबाईलचा वापर होतो कशासाठी यावर लक्ष ठेवण्यासाठी पालकांना काही साधने उपलब्ध आहेत. स्क्रीन टाईम, फॅमीसेफ, कंटेंट वॉचसारखे अॅप्लिकेशन प्लेस्टोअरवर उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग करता येईल. स्क्रीन रेकॉर्डरच्या साहाय्यानेही मुलांच्या मोबाईल हाताळण्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते.
चौकट
स्मार्ट फोन, पीसीचा धोका
“सध्या ११-१२ वर्षांची मुले लैंगिकदृष्ट्या सक्रिय झाली आहेत. हातात स्मार्टफोन आल्याने एका क्लिकवर पॉर्न फिल्म, व्हिडिओ उपलब्ध होतात. लैंगिक दृश्ये पाहून चाळवलेली मुले स्वत:ची गरज पूर्ण करण्याचे विविध मार्ग शोधतात. लैंगिक क्रियांचे मुलांमध्ये दूरगामी परिणाम होतात. स्त्रीकडे पाहण्याचा मुलांचा दृष्टिकोन बदलू शकतो. ‘पॉर्न फिल्म’ हेच सत्य असे त्यांना वाटू लागते. एकाग्रता कमी होणे, स्मृतिभ्रंश होणे, आत्मविश्वास कमी होणे, अभ्यासातील लक्ष कमी होणे असे परिणाम मुलांमध्ये दिसू लागतात. भविष्यात त्यांच्या वैवाहिक, लैंगिक आयुष्यावरही याचा परिणाम होतो. शारीरिकदृष्ट्याही लैंगिक समस्या निर्माण होऊ शकतात.”
- डॉ. अमित नाळे, लैंगिकतज्ज्ञ
चौकट
‘ही वेळ योग्य नव्हे’
“पॉर्न पाहणे, त्याबद्दल बोलणे आणि त्यातून लैंगिक क्रियांची इच्छा याचे प्रमाण मुला-मुलींमध्ये वाढत आहे. पूर्वीही अशा घटना घडायच्या. मात्र मुले शाळेत जात असल्याने, खेळण्यासाठी मैदानावर किंवा क्लासला जात असल्याने तिथे त्यांचे मन गुंतत होते. आता संपूर्ण वेळ घरात असल्याचे स्क्रीनशी त्यांची जवळीक वाढली आहे. मुलांशी या गोष्टींबद्दल बोलणे आवश्यक आहे. हे सगळे करायचेच आहे, मात्र त्यासाठी ही वेळ योग्य नव्हे हे मुलांना समजावून सांगितले पाहिजे. मित्र-मैत्रिणींच्या गप्पांमध्येही हे विषय बोलले जातात. अशा वेळी सर्वांच्या पालकांनी एकत्र येऊन सामूहिक समुपदेश करुन घेता येऊ शकते.”
- श्रुती पानसे, समुपदेशक
चौकट
...असे ठेवा नियंत्रण - मुक्ता चैतन्य, सायबर अभ्यासक
* सर्व स्मार्ट फोनमध्ये सेटिंगमध्ये पॅरेंटल कंट्रोलचा पर्याय उपलब्ध असतो. तो वापरून पालक मुलांचा स्क्रीन टाइम मॉनिटर करू शकतात.
* बरेचदा घरातील मोठ्या माणसांच्या फोनमधूनच मुलांना पॉर्न जगताची ओळख होते. मोबाईलमध्ये असा कंटेंट असल्यास त्याचा स्वतंत्र फोल्डर करून तो लॉक किंवा हाईड करून ठेवावा.
* मोठ्या माणसांच्या फोनमधील गुगल, यूट्यूबच्या सर्च हिस्ट्री बंद करून ठेवाव्यात.
* मुलांशी लैंगितकेविषयी, पॉर्नच्या दुनियेतील धोक्यांविषयी मोकळेपणाने बोलावे.
* पॉर्न व्हिडिओ शेअर करणे कायद्याने गुन्हा आहे, याची मुलांना कल्पना देणे गरजेचे असते.
* १३ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींना फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावर स्वत:चे अकाऊंट काढण्याची परवानगी नसते.
* मुलांचा ईमेल आयडी सुरू करायचा असल्यास तो पालकांच्या नियंत्रणाखालीच काढावा. ईमेल आयडीसाठी मुलांचे वय जास्त दाखवण्याची चूक पालकांनी करु नये.
* सोशल मीडियावर अनोळखी लोक भेटतात, चॅट केले जाते. यातून सायबर बुलिंगसारखे प्रकारही घडतात. त्यामुळे मुलांच्या इंटरनेट वापराकडे पालकांचे बारकाईने लक्ष असले पाहिजे.