‘सेझ’चे शिक्के ठरतायत शेती विकासात अडसर
By admin | Published: May 12, 2014 03:32 AM2014-05-12T03:32:46+5:302014-05-12T03:32:46+5:30
खेड तालुक्यात शेतकर्यांच्या १७ हजार एकर जमिनीवर मारलेले ‘सेझ’चे शिक्के आता शेती विकासात अडसर ठरत आहेत.
वाफगाव : खेड तालुक्यात शेतकर्यांच्या १७ हजार एकर जमिनीवर मारलेले ‘सेझ’चे शिक्के आता शेती विकासात अडसर ठरत आहेत. आठ वर्षांपूर्वी खेड तालुक्याच्या पूर्व भागात सुमारे सतरा हजार एकर क्षेत्रावर अत्याधुनिक ‘खेड सिटी’ प्रस्तावित करण्यात आली होती. याअंतर्गत काही जागेवर विशेष आर्थिक क्षेत्र (एस.ई.झेड.), तर बाकी जागेवर औद्योगिक वसाहत, कॉलेज, शाळा, राहण्यासाठी वसाहत, हॉस्पिटल आदींची निर्मिती केली जाणार होती. त्याअंतर्गत कन्हेरसर, वरुडे, वाफगाव, टाकळकरवाडी, गुळाणी, वाकळवाडी, गोसासी या गावांतील क्षेत्राचा समावेश होता. त्या वेळी या गावातील शेतजमिनीवर सरकारने शिक्कामोर्तब करत शेतकर्यांच्या जमिनीच्या सातबारा ८अवर शिक्के मारले आहेत. पुढे जाऊन एस.ई.झेड. प्रकल्पाला योग्य प्रतिसाद न मिळाल्याने व शेतकर्यांनी केलेल्या प्रखर विरोधामुळे पुढील भू-संपादन सरकारने बंद केले. परंतु, सातबार्यावरील शिक्के मात्र अद्याप आहे त्याच स्थितीत आहेत. त्यामुळे या गावातील शेतकर्यांना कोणत्याही प्रकारचा शेतीसाठीचा लाभ घेता येत नाही. एका बाजूला शासनाने शेतकर्यांसाठी विविध योजना राबविण्याचे धोरण ठेवले आहे, तर दुसर्या बाजूला शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे या भागातील शेतकर्यांना कोणत्याही प्रकारच्या शासनाच्या योजनेचा लाभ घेता येत नाही. वाफगाव, गुळाणी, वाकळवाडी, कन्हेरसर या गावांतील अनेक शेतकर्यांनी ठिबक सिंचन, शेततळे, पॅकहाऊस, पॉलीहाऊस, ग्रीनहाऊस, रोजगार हमीतून विहीर खोदाई, फळबाग, कुक्कुटपालन आदी अनेक योजनांसाठी प्रयत्न केले आहेत. परंतु, सातबार्यावर असणार्या सेझच्या शिक्क्यामुळे या शेतकर्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही. सेझ रद्द व्हावा म्हणून शेतकर्यांच्या बाजूने सेझच्या विरोधात भांडणार्या काही नेत्यांनीदेखील या विषयावर काहीच ठाम भूमिका न घेतल्याने शेतकरी सध्या संभ्रमात दिसत आहेत. सेझचे असणारे सातबार्यावरील शिक्के शासनाने काढावेत म्हणून शेतकरी लढा देण्यासाठी पुन्हा तयारी करू पाहत आहेत व ‘सेझचे शिक्के काढा, आम्हाला शेती करू द्या,’ अशी आर्त हाक मारत आहेत.