Video: शरीर कंप पावले तरी 'शां. ब. मुजुमदार' बरसतच राहिले अन् भाषण सुरूच ठेवले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 12:50 PM2022-03-07T12:50:14+5:302022-03-07T12:52:45+5:30
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सिंबायोसिसच्या वाटचालीचा आढावा सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार मांडत होते. ...
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सिंबायोसिसच्या वाटचालीचा आढावा सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार मांडत होते. तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागले. शरीर कंप पावले. मात्र, विद्यार्थ्यांविषयी असणारा कळवळा, शिक्षणाविषयीची निष्ठा या साऱ्यांच्या बळावर ते बोलतच राहिले. त्यांनी आपले भाषण थांबवले शेवटपर्यंत थांबवले नाही. अखेर खुद्द मोदी यांनीच त्यांना काहीतरी होत असल्याचे विद्या येरवडेकर यांना सांगितले. तेव्हा मुजुमदार यांना खुर्चीवर बसविले. त्यांनी खुर्चीवर बसून आपले उर्वरित मनोगत पूर्ण केले. वयाच्या ८७ व्या वर्षीही मुजुमदार यांची ही जिद्द पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला, तर काहींच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
मुजुमदार उभे राहून भाषण करत असल्याने त्यांना त्रास होत असल्याचे मोदी यांच्या लक्षात आले. त्यावर त्यांनी सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांना मुजुमदार यांना खुर्चीवर बसून भाषण करू द्यावे, अशी सूचना केली. त्यानुसार तत्काळ मुजुमदार यांना खुर्ची देण्यात आली. त्यांनी आपल्या भाषणाचा उर्वरित भाग पूर्ण केला. नवे शैक्षणिक धोरण व सध्याच्या वैद्यकीय शिक्षणाच्या स्थितीवरही भाष्य केले. त्यांचे भाषण सुरू असताना सभागृहातील हजारो विद्यार्थी व प्राध्यापकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला.
भारतीय व परदेशी विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक आदानप्रदान व्हावे, या उद्देशाने एका लहानशा खोलीत सुरू करण्यात आलेल्या सिंबायोसिसचे आंतरराष्ट्रीय विद्यापीठात रुपांतर झाले. संस्थेच्या स्थापनेपासून सुवर्णमहोत्सवी वर्षापर्यंत डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. रविवारी संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या नियोजनात मुजुमदार स्वत: लक्ष घालत होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना आराम करण्यास सांगितले. मात्र, त्याकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. पंतप्रधान कार्यक्रमास येणार असल्याने ते व्यासपीठावर फेऱ्या मारताना दिसत होते. नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी ते जातीने हजर होते. बराच वेळ उभे राहिल्याने त्यांना काही काळ अस्वस्थ वाटू लागले होते.
वयाच्या ८७ व्या वर्षी एखाद्या तरुणाला लाजवेल असा त्यांचा कार्यक्रमात वावर होता. कार्यक्रमानंतरही त्यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांची आपुलकीने संवाद साधला.