तोडफोडीच्या राजकारणाचा श्रीगणेशा

By admin | Published: September 14, 2016 12:43 AM2016-09-14T00:43:25+5:302016-09-14T00:43:25+5:30

महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना विविध राजकीय पक्षांमध्ये तोडफोडीच्या राजकीय खेळी खेळल्या जात आहेत.

Shabd Ganesh from politics of turmoil | तोडफोडीच्या राजकारणाचा श्रीगणेशा

तोडफोडीच्या राजकारणाचा श्रीगणेशा

Next

पिंपरी : महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना विविध राजकीय पक्षांमध्ये तोडफोडीच्या राजकीय खेळी खेळल्या जात आहेत. शिवसेनेतून राष्ट्रवादीत तर राष्ट्रवादीतून भाजपात काँग्रेसमधून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होऊ लागले आहेत. स्थानिक नेत्याकडून आपापले पक्ष बळकट करण्यासाठी बेरजेचे समीकरण जुळविले जात आहे.
काँग्रेसच्या नगरसेविका जयश्री गावडे यांचे पती वसंत गावडे व मुलगा आशिष गावडे यांनी मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसला खिंडार पडल्याचा दावा भाजपाने केला आहे. ‘पतीराज किंवा मुलगा भाजपात गेला असला, तरी मी काँग्रेसमध्येच आहे, अशी प्रतिक्रिया नगरसेविका गावडे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिका राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून, या बालेकिल्यास सुरुंग लावण्याचे काम भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी सुरू केले आहे. सुरुवातीला राष्ट्रवादीच्या नगरसेविकांचे पती, अनेक युवा नेते आणि कार्यकर्ते यांना भाजपामध्ये प्रवेश देण्यात आला. राष्ट्रवादीतील मोहरे फोडण्याचा प्रयत्न जगताप करू लागले आहे. नुकतेच भोसरीचे आमदार महेश लांडगे मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन आले. त्यांच्या या भेटीतून लवकरच भाजपात त्यांचा प्रवेश होणार याचे संकेत मिळाले. राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीची खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांना दखल घ्यावी लागली. महापालिका निवडणूक काही महिन्यांवर असताना पवार यांना शहरात पक्ष कार्यकर्ता मेळावा घ्यावा लागला. एवढेच नाही, तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरसुद्धा गणेश मंडळांच्या आरतीला हजेरी लावण्याची वेळ आली. ज्या दिवशी पवार यांनी आवर्जून सांगवी, रहाटणी परिसरात गणेश मंडळांच्या आरतीला हजेरी लावली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी याच भागातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष हर्षल ढोरे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाने आता राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसमध्येही तोडफोड सुरू केली.
रहाटणी, सांगवी परिसरात माजी उपमुख्यमंत्री पवार यांनी आवर्जून हजेरी लावल्यानंतर उलट परिणाम जाणवला. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता दुसऱ्याच दिवशी भाजपमध्ये दाखल झाला. तर आकुर्डी भागात पवार यांनी दिलेल्या भेटीत राष्ट्रवादीला अनुकुल परिणाम जाणवला. आकुर्डीतील शिवसेनेची एक नगरसेविका राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यास तयार झाली. शिवसेनेतील काही कार्यकर्ते राष्ट्रवादीचे
माजी महापौर आझम पानसरे यांच्या संपर्कात आहेत. (प्रतिनिधी)

नगरसेविका जयश्री गावडे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, प्रभाग क्रमांक २४च्या काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या आहेत. या भागातून त्या दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्या म्हणूनही गावडे यांची ओळख आहे. त्यांचे पती वसंत गावडे यांनी भाजपा प्रवेशानंतर नगरसेविकाही भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. याबाबत नगरसेविका गावडे म्हणाल्या, ‘‘पती आणि मुलाने भाजपात प्रवेश केला असला, तरी मी अद्याप तरी काँग्रेसमध्येच आहे.’’

Web Title: Shabd Ganesh from politics of turmoil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.