शाहिरी परंपरेला नाही राजाश्रय

By admin | Published: August 29, 2016 03:03 AM2016-08-29T03:03:35+5:302016-08-29T03:03:35+5:30

शाहिरी परंपरेला अद्यापही लोकाश्रय आहे, राजाश्रय मात्र मिळत नाही. त्यामुळे महाराष्ट्र शाहिरी परिषदेला गेली पाच वर्षे अधिवेशन घेता आले नाही

Shahi tradition does not have a king house | शाहिरी परंपरेला नाही राजाश्रय

शाहिरी परंपरेला नाही राजाश्रय

Next

पिंपरी : शाहिरी परंपरेला अद्यापही लोकाश्रय आहे, राजाश्रय मात्र मिळत नाही. त्यामुळे महाराष्ट्र शाहिरी परिषदेला गेली पाच वर्षे अधिवेशन घेता आले नाही, अशी खंत शाहीर परिषदेचे प्रांताध्यक्ष दादा पासलकर यांनी व्यक्त केली.
प्राधिकरणातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या मनोहर वाढोकार सभागृहात स्वर्गीय शाहीर योगेश स्मृतिगंध पुरस्कार वितरण झाले. कोल्हापूरचे शाहीर रंगराव पाटील यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ११ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी पासलकर बोलत होते. ते म्हणाले, ‘‘शाहिराची गरज समाजाला आहे. स्वर्गीय शाहीर योगेश अण्णांनी दाखविलेल्या मार्गावरून चालत आहोत. शब्दांचे भांडवल साहित्यिकांपेक्षा शाहिरांकडे अधिक असते. शाहिराला शाबासकीची थाप पडावी, अशी अपेक्षा असते.
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले खासदार अमर साबळे म्हणाले, ‘‘शाहिरी परंपरा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परंतु जोपर्यंत या देशात शौर्य गाजविणारे लोक आहेत, तोपर्यंत शाहिरी परंपरा लोप पावणार नाही, हे लक्षात घ्यावे. शाहिरी परंपरेला राजाश्रय मिळवून देण्याचे प्रयत्न केले जातील. शाहिरी कलावंतांसाठी शहरात एखादे दालन सुरू केल्यास खासदार निधीतून निधी देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. केंद्र शासनाचा नमामी गंगा हा नदी स्वच्छतेचा उपक्रम आहे. या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी शाहिरांची मदत आवश्यक वाटल्यास घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन म्हणाले, ‘‘शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे दर वर्षी अनुदान दिले जाते. त्यासाठी परिषदेने प्रस्ताव पाठवावा. इतिहासाचे पोवाडे शाहिरांनी सादर करावेतच,पण बदलत्या काळात विकासाचे पोवाडेसुद्धा रचावेत. कर्तृत्ववान व्यक्तींची यशोगाथा पोवाड्यातून सादर करावी.’’ बालशाहीर हेरंब पायगुडे, ऋतिक धार्इंजे, संतोष कापसे, पार्थ साळवी, प्रणव कापसे यांचाही सन्मान करण्यात आला. निमंत्रक प्रवीण घुले, हेमंतराजे मावळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प. महाराष्ट्र संपर्कप्रमुख संदीप जाधव, एकनाथ पवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Shahi tradition does not have a king house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.