शिवजयंतीदिनी पोवाडे गाणाऱ्या शाहिरांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:34 AM2021-02-20T04:34:06+5:302021-02-20T04:34:06+5:30
पुणे : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी यंदा सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई होती. मात्र शाहीर हेमंतराजे मावळे यांच्यासह ...
पुणे : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी यंदा सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई होती. मात्र शाहीर हेमंतराजे मावळे यांच्यासह शाहिरांनी पोवाड्यांचे सादरीकरण केल्याने पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कुठेही कार्यक्रम, रॅली, शोभायात्रा किंवा कुठल्याही प्रकारची गर्दी करण्यास पोलीस प्रशासनाने बंदी केली होती. या नियमांचे उल्लंघन करत शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष हेमंत मावळे यांनी लाल महालाच्या सभागृहात आणि चौकात इतर शाहिरांसमवेत पोवाडे सादर केले. तिथे येणाऱ्या-जाणाऱ्यांनी ऐकण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली. त्यामुळे मावळे हे तिथून हटायला तयार नव्हते. या वेळी मावळे यांच्यासह शाहीर गणेश टोकेकर, अरुणकुमार बाभुळगावकर, ओंकार चिकणे, विनायक कालेकर, प्रा.संगीता मावळे, सुरेश तरलगट्टी आदी उपस्थित होते.
राज्यसरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई केली. ज्यात पोवाडे कार्यक्रम करू नये, याचाही समावेश आहे. मात्र शाहीर हेमंतराजे मावळे यांनी १५ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सांगणारे पोवाडे कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र सरकारला पाठविले होते. परंतु या पत्राला सरकारकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे निषेध म्हणून मावळे यांनी लाल महालासमोर पोवाडयांचे सादरीकरण केले.
पोवाड्यांवर बंदी घालणे म्हणजे ठाकरे सरकारच्या काळात राज्यात मोगलाई आली आहे का? असा सवाल शाहीर हेमंतराजे मावळे यांनी केला. तसेच शिवरायांचे बालपण ज्या ठिकाणी गेले त्याच लालमहाल परिसरात पोवाडा सादर करुन आम्ही निषेध करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
------------------------------------------------------------------------------------------