पोवाडा गायला म्हणून शाहीर हेमंतराजे मावळे यांना पुणे पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 06:53 PM2021-02-19T18:53:29+5:302021-02-19T18:54:31+5:30
राज्यसरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई केली आहे.
पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई करण्यात आली होती. मात्र शाहीर हेमंतराजे मावळे यांनी लाल महालासमोर पोवाडे गायले. ज्यानंतर त्यांना पोलिसांनीअटक केलीये.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कुठेही कार्यक्रम, रॅली, शोभायात्रा किंवा कुठल्याही प्रकारची गर्दी करण्यास पोलीस प्रशासनाने बंदी केली होती. या नियमाचं उल्लंघन करत शाहीर हेमंतराजे मावळे यांनी लाल महालसमोर काही साथीदारांसह पोवाडे सादर केले. येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी तिथे जमत होती. त्यामुळे मावळे हे तिथून हटायला तयार नव्हते. अखेर पोलिसांना त्यांना अटक करावी लागली.
राज्यसरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई केली आहे. ज्यात पोवाडे कार्यक्रम करू नये, याचाही समावेश आहे. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे यांनी १५ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सांगणारे पोवाडे कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र राज्य सरकारला पाठविले होते. मात्र या पत्राला सरकारकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे निषेध म्हणून मावळे यांनी आज लाल महाल समोर पोवाडे गायले.