समाजाला जागृत करण्यासाठीच शाहिरी कला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:10 AM2021-07-27T04:10:38+5:302021-07-27T04:10:38+5:30
ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र खरे : शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे 'शाहिरी निनाद' या अंकाचे प्रकाशन पुणे : वीरश्रीयुक्त काव्य असलेली ...
ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र खरे : शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे 'शाहिरी निनाद' या अंकाचे प्रकाशन
पुणे : वीरश्रीयुक्त काव्य असलेली शाहिरी ही मराठी कला आहे. स्वर आणि शब्द यांचा दीर्घकाळ टिकणारा मिलाप शाहिरीमध्ये पाहायला मिळतो, समाजाला जागृत करण्याची कला शाहिरीत आहे, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र खरे यांनी व्यक्त केले. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे कसबा पेठेतील नामदेव शिंपी कार्यालय येथे 'शाहिरी निनाद' या अंकाचे प्रकाशन रवींद्र खरे यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे, अरुणकुमार बाभुळगावकर आदी उपस्थित होते.
खरे म्हणाले, ‘स्वर आणि शब्द दीर्घकाळ टिकत असल्याने भारतीय विज्ञान व इतिहास हा काव्यबद्ध करण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळेच आपली काव्ये जिवंत राहिली. शाहिरी त्याचे अनुसरण करणारी कला आहे. शौर्य आणि भक्ती आपल्याला शाहिरीतून बघायला मिळते. मात्र, ते सादरीकरण करण्यासाठी मोठा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.’
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, ‘शाहीर म्हणून आपला बाणा कडक असणे गरजेचे आहे. शाहिरी निनाद अंकामध्ये कोविडकाळात कलावंतांसाठी केलेल्या कामाची माहिती देण्यात आली आहे.’ अक्षदा इनामदार हिने सूत्रसंचालन केले. अरुणकुमार बाभुळगावकर यांनी आभार मानले.