शकुंतला फडणीसच्या वागण्या-बोलण्यात कधी अहंभाव नव्हता : डॉ. न. म. जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:10 AM2021-04-26T04:10:32+5:302021-04-26T04:10:32+5:30
पुणे : शकुंतला फडणीस यांचे व्यक्तिमत्त्व निगर्वी, निरामय, निस्पृह आणि निरलस होते, शकुंतलाबाईंच्या वागण्या-बोलण्यात कधी अहंभाव दिसला नाही. उदंड ...
पुणे : शकुंतला फडणीस यांचे व्यक्तिमत्त्व निगर्वी, निरामय, निस्पृह आणि निरलस होते, शकुंतलाबाईंच्या वागण्या-बोलण्यात कधी अहंभाव दिसला नाही. उदंड आयुष्य जगल्या. आपली मते स्पष्टपणे मांडत आणि सार्वजनिक जीवनात वावरताना कुठलीही जबाबदारी घेण्यास तयार असत. स्वत:वरही विनोद करताना त्यांच्यातील हजरजबाबीपणा दिसून येई, अशा शब्दांत ज्येष्ठ बाल साहित्यिकार, शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी फडणीस यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडले.
अमरेंद्र-भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे रविवारी (दि. २५) दिवंगत लेखिका शकुंतला फडणीस यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑनलाईन श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. त्या वेळी डॉ. जोशी बोलत होते. संस्थेच्या अध्यक्षा संगीता बर्वे, सहकार्यवाह आणि संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, शकुंतला फडणीस यांच्या कन्या रूपा देवधर आणि लीना गोगटे, प्रसिद्ध व्यंगचित्रकार चारूहास पंडित, बालरंजन केंद्राच्या अध्यक्षा आणि नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे सहभागी झाले होते.
चारूहास पंडित म्हणाले, शकुंतला फडणीस यांचे साहित्य क्षेत्रात वेगळे अस्तित्व होते. शि. द. फडणीस यांना त्यांनी आयुष्यभर साथ दिली. प्रेमळ व्यक्तिमत्त्व आपल्यात नाही यामुळे दु:ख होत आहे.
बालकुमार साहित्य संस्थेतील फडणीस यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करून संगीता बर्वे यांनी फडणीस यांचा बालसाहित्याच्या चळवळीत महत्वाचा सहभाग असल्याचे नमूद केले.
सुनील महाजन म्हणाले, बालसाहित्याच्या क्षेत्रात शकुंतला फडणीस यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. लेखन क्षेत्रात मोठे योगदान दिलेले असूनही त्यांचा वावर कायमच कार्यकर्त्यासारखा असायचा.
कथाकथन हे शकुंतला फडणीस यांचे बलस्थान होते, असे मत माधुरी सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.
साहित्याच्या क्षेत्रात आईचा वावर असला तरी तिचा घरातील वावर सर्वसामान्य गृहिणी सारखाच असायचा. साहित्याचे अनेक प्रकार तिने हाताळले. आई प्रागतिक विचारांची होती. तिने कधी धार्मिक अवडंबर माजवले नाही, असे रूपा देवधर म्हणाल्या. तर लीना गोगटे यांनी, विविध विषयावर आईचे लिखाण असायचे. ते लिखाण आम्हाला आवर्जून दाखवायची. आम्ही काही बदल सुचविले तर ते आनंदाने स्वीकारायची. लिखाणाची उर्मी तिला स्वस्थ बसू देत नसे. तिचे बालसाहित्य आम्हाला खूप भावले. साहित्यातून मुलांना तिने कधी उपदेशाचे डोस पाजले नाही असे सांगितले.
--
चौकट
पत्नी, सखी, सचिव अन् सहप्रवासी
माझ्या आयुष्याच्या वाटचालीतील शकुंतला पत्नी, सखी, सचिव अन् सहप्रवासी होती. मी हाती घेतलेले कार्य सहजसाध्य व्हावे यासाठी तिचा हिरीरीने पुढाकार आणि सहभाग असायचा. तिच्या जाण्याने व्यक्तिश: आघात झाला असला तरी तिच्या स्मृतींची शिदोरी मला पुढील वाटचालीस उपयुक्त ठरेल अशी भावना शि. द. फडणीस यांनी व्यक्त केली.