पुरंदरावर साकारणार शंभूराजांचे शिल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:08 AM2021-06-23T04:08:59+5:302021-06-23T04:08:59+5:30
पुणे : स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभू महाराजांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी पालिकेमार्फत पुरंदर किल्ल्यावर शिल्प साकारण्यात येणार आहे. एक कोटी ...
पुणे : स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभू महाराजांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी पालिकेमार्फत पुरंदर किल्ल्यावर शिल्प साकारण्यात येणार आहे. एक कोटी रुपयांच्या या प्रस्तावाला मंगळवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
सिंहगड किल्ल्यावर शूरवीर तानाजी मालुसरे यांचे शिल्प पालिकेमार्फत उभारण्यात आले आहे. पालिकेने २५ लाखांची तरतूद केली होती. याच धर्तीवर पुरंदर किल्ल्यावर स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प साकारण्यात येणार आहे. त्यासाठी १ कोटीची तरतूद करण्याचा प्रस्ताव नगरसेविका अर्चना पाटील यांनी स्थायी समितीला दिला होता.
संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर १४ मे १६५७ रोजी झाला होता. संस्कृतभाषा निपुण, प्रजाहितदक्ष, स्वराज्याची धुरा सक्षमपणे सांभाळणारे संभाजी महाराज असामान्य व्यक्तिमत्त्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य हे त्यांचे विशेष गुण होते. अशा महापराक्रमी महापुरुषांचे शिल्प पुरंदर किल्ल्यावर म्हणजेच त्यांचे जन्मस्थळी उभारल्यास त्याच्या प्रति ही खरी मानवंदना ठरेल, असे पाटील यांनी प्रस्तावात म्हटले आहे.