शंभूराजांचा इतिहास पाठ्यपुस्तकात- विनोद तावडे; समाधीस्थळी हजारो भक्तांची पुष्पवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:05 AM2018-03-18T00:05:24+5:302018-03-18T00:05:24+5:30
धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या ३२९ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे शनिवारी राज्यभरातून आलेल्या हजारो शंभूभक्तांनी समाधिस्थळावर पुष्पवृष्टी केली.
कोरेगाव भीमा (जि. पुणे) : धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या ३२९ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे शनिवारी राज्यभरातून आलेल्या हजारो शंभूभक्तांनी समाधिस्थळावर पुष्पवृष्टी केली. धर्मसभेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी, पुढच्या पिढीला शिवरायांचे प्रशासक नेतृत्व व शंभू छत्रपतींचा खरा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
भीमानदी तीरावर श्री क्षेत्र वढू-तुळापूर या स्मारकांना जोडणाऱ्या पुलाच्या निर्मितीच्या मागणीस हिरवा कंदील मिळाल्याचे सूतोवाच मंत्रिमहोदयांनी दिल्याने यापुढील काळात वढू-तुळापूर-आळंदी-देहू तीर्थक्षेत्र जोडण्यास मदत होणार आहे.
ग्रामपंचायत व धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात सकाळी साडेअकरा वाजता मंत्रोपचारात पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच शासकीय मानवंदनाही देण्यात आली. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट,खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबूराव पाचर्णे, इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांच्यासह शंभूभक्त उपस्थित होते.
तावडे म्हणाले, ‘श्री क्षेत्र वढू बुद्रुक हे आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. राज्य शासनाच्या वतीने शंभू छत्रपतींच्या समाधिस्थळाचा विकास आराखडा तयार करून आवश्यक तो निधी उपलब्ध करू. मराठा मोर्चाच्या मागणी पत्रावर निर्णय सुरू झाले आहेत. शिवशंभूंनी निर्माण केलेले स्वराज्य आपण सुजलाम सुफलाम करण्याचे काम करण्याची गरज असून, १ जानेवारीच्या दंगलीतील सर्व गुन्हे शासन मागे घेईल.
पुरस्कार वितरण
या वर्षीचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार डॉ. अमोल कोल्हे यांना, तर शंभूसेवा पुरस्कार मध्य प्रदेश इंदोर येथील युवराज विष्णू वस्ताद काशिद व गोकाकचे राजीव जाधव यांना प्रदान करण्यात आला.