शनिवारवाडा ’व्यासपीठ’ म्हणून कार्यक्रमांना देण्याबाबत अधिकार महापौरांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 10:01 PM2018-05-11T22:01:40+5:302018-05-11T22:01:40+5:30
काही कार्यक्रमानंतर निर्माण झालेल्या सामाजिक तणावामुळे शनिवारवाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याबाबतचे निर्णय काही महिन्यांपूर्वी तत्कालिन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी जाहीर केला होता.
पुणे : महापालिकेने शनिवार वाड्यासमोर बांधलेले व्यासपीठ कार्यक्रमांसाठी म्हणून देण्याचे सर्वाधिकार महापौरांना देण्याचा निर्णय शुक्रवारी महापालिकेत झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. याचे धोरण ठरवून त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येईल असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. रोख रकमेच्या पुरस्काराला सरकारी निर्बंध आल्यामुळे यापुढे मानपत्र देऊन कार्यक्रम करण्याचा महत्वाचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
काही कार्यक्रमानंतर निर्माण झालेल्या सामाजिक तणावामुळे शनिवारवाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याबाबतचे निर्णय काही महिन्यांपूर्वी तत्कालिन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी जाहीर केला होता. गुप्तचर खात्याच्या अहवालानुसार सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र त्यावर सर्वच थरातून टीका झाली. खुद्द महापौरांनीच आयुक्तांना त्यांचा हा निर्णय त्यांनी त्वरीत मागे घ्यावा असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे हा निर्णय आयुक्तांनी मागे घेतला. त्यानंतर हा विषय प्रलंबित होता. शुक्रवारी झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली व त्यासंबधीचे सर्व अधिकार महापौरांना द्यावे असा ठराव करण्यात आला.
रस्ते, चौकांच्या तसेच सार्वजनिक वास्तूंच्या नामकरणाबाबतही चर्चा झाली. एकदा दिलेले नाव बदलता येणार नाही, चार नगरसेवकांच्या प्रभागात तिघांच्या संमतीने निर्णय घेण्यात येईल, ज्यांनी महापालिकेला विनामोबदला जमीन दिली आहे, त्यांची मागणी असेल तर त्यांचे नाव देता येईल असे काही नियम याबाबतीत करण्यात आले. महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले की शनिवार वाडा पटांगण जाहीर कार्यक्रमांना देणे तसेच नामकरण या दोन्ही गोष्टींबाबत महापालिकेचे धोरण आहेच, मात्र त्यात काही त्रुटी होत्या, त्यात दूर करून नव्याने काही नियम करण्यात येतील व त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येईल.
महापालिकेच्या वतीने दरवर्षी अनेक पुरस्कार देण्यात येत असतात. त्यातील रोख रकमांना सरकारी निर्बंधामुळे मर्यादा आली आहे. त्यामुळे हे पुरस्कार बंद करण्यात आले होते. मात्र त्याबाबत ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांनी महापालिकेकडे रोख रकमा बंद झाल्या असल्या तरी पुरस्कार बंद करू नये, संबधितांना मानपत्र द्यावे अशी मागणी केली होती. पक्षनेत्यांच्या बैठकीत ही मागणी मान्य करण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले. त्यानुसार आता पुरस्कार प्राप्त व्यक्तींना जाहीर कार्यक्रमात महापालिकेच्या वतीने मानपत्र प्रदान करण्यात येईल असे त्या म्हणाल्या.
..................
लाल महालात शहाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा प्रस्ताव होता. तळजाई येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची मागणी होती. शहरात कोणताही पुतळा सार्वजनिक ठिकाणी बसवण्याबाबत राज्य सरकारने एक धोरण तयार केले आहे. त्याला अनुसरून याबाबत निर्णय घेतला जावा असे पक्षनेत्यांच्या बैठकीत ठरवण्यात आले. महापौर मुक्ता टिळक व सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी याची माहिती दिली.