शनिवारवाडयातल्या भाषणा प्रकरणी जिग्नेश मेवाणी, उमर खालिद विरोधात पुण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 11:44 AM2018-01-04T11:44:44+5:302018-01-04T11:45:46+5:30
शनिवारवाडयात चिथावणीखोर भाषण केल्या प्रकरणी गुजरातमधील दलित नेते जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे - शनिवारवाडयात चिथावणीखोर भाषण केल्या प्रकरणी गुजरातमधील दलित नेते जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात कलम 153(अ), 505 आणि 117 अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे.
पुण्याच्या सभेत काय म्हणाला होते जिग्नेश मेवाणी
देशात जातीअंताची नवी क्रांती संसदेत घडणार नाही, तर जनआंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरूनच होईल. ही लढाई नवी पेशवाई संपवेल. त्यासाठी कोणत्याही जाती-धर्माचा, पक्षाचा, विचारधारेचा, गटा-तटाचा विचार न करता एकत्रित येवून लढा उभारला तर २०१९ मधील महासंग्रामात नरेंद्र मोदी यांना घरी बसवू, असा इशारा गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी दिला होता.
भीमा कोरेगाव येथील क्रांती स्तंभाला २०० वर्षे पूर्ण होत आहेत, यानिमित्त शनिवारवाड्यावर आयोजित एल्गार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ‘आरएसएस’वर हल्लाबोल केला. भाषणाच्या सुरवातीलाच त्यांनी पुण्यातील हिंदुत्ववादी संघटनांवर टीका केली. ते म्हणाले, एल्गार परिषदेत सहभागी होऊ नये, अशी भीती काही संघटनांकडून घातली जात होती. पण, मी तुमच्या मोदी व शहांना घाबरलो नाही. तुम्ही तर अजून बच्चे आहात. ५६ इंची छाती फाडून येथे आलो आहे.
Pune: FIR registered against Jignesh Mevani and Umar Khalid under section 153(A), 505 & 117 at Vishrambaug Police Station
— ANI (@ANI) January 4, 2018
उमर खालीद काय म्हणाला
पंतप्रधान रामंदिरावर चर्चा करतील. पण जय शहा यांच्या ‘टेम्पल’ या कंपनीवर बोलणार नाहीत. वैचारिकदृष्ट्या कमजोर लोकांकडून दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या केल्या जातात.
- उमर खालीद, जेएनयूमधील आंबेडकर विद्यार्थी संघटनेचा नेता