शंकर महादेवन यांनीही धरला ताल
By admin | Published: July 20, 2015 03:30 AM2015-07-20T03:30:12+5:302015-07-20T03:30:12+5:30
आपल्या सुरांनी तमाम भारतीयांना वेड लावणारे प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी तरुणांसह लहान-थोरांनी
पुणे : आपल्या सुरांनी तमाम भारतीयांना वेड लावणारे प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी तरुणांसह लहान-थोरांनी एकच गर्दी केली होती. पुण्याची नवी ओळख असलेल्या ढोल पथकासोबत महादेवन तरुणांतीलच एक होऊन गेले. तरुणांसोबत ताशा वाजवत त्यांनी आपल्यातील संगीतकाराची प्रत्यक्ष ओळखच पुणेकरांना करुन दिली.
वंदेमातरम् संघटनेच्या युवा वाद्य पथकातर्फे ढोलताशा पथकातील वाद्यांचे पूजन रविवारी महादेवन यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले. या वेळी सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोहिते, अॅड. प्रताप परदेशी, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई व युवा वाद्य पथकाचे प्रमुख वैभव वाघ व्यासपीठावर उपस्थित होते.
आपले करिअर आणि व्याप सांभाळून ढोलवादनाच्या निमित्ताने एकत्र आलेला तरुणवर्ग संगीताच्या माध्यमातून रसिकांना आनंद देत आहे. तरुणांची ही एकप्रकारची संगीत साधनाच आहे. जगात होणाऱ्या विविध महोत्सवात तेथील पारंपरिक वाद्ये वापरली जातात. तेव्हा महाराष्ट्रात ढोल या आपल्या पारंपरिक वाद्याचा वापर व्हायला काय हरकत आहे, असा प्रश्न महादेवन यांनी उपस्थित केला. मुलांच्या बरोबरीने मुलींचा वादनातील वाढता सहभाग हाही लक्षणीय असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
शहरात दिवसेंदिवस पथकांची संख्या वाढत असली तरीही वादकांच्या मनात वाद्याबद्दल असणारी निष्ठा एकच असते. या उद्देशाने हे वाद्यपूजन करण्याचे ठरविल्याचे पथकाचे प्रमुख वैभव वाघ यांनी सांगितले.