सोशल मीडियावरही ‘शांताबाई’चा गजर
By admin | Published: October 15, 2015 12:44 AM2015-10-15T00:44:47+5:302015-10-15T00:44:47+5:30
गणेशोत्सवाच्या काळात ‘शांताबाई’ या गाण्याने चांगलाच कहर केला होता. या गाण्याने भल्याभल्यांनाही नाचवायला लावले.
पिंपळवंडी : गणेशोत्सवाच्या काळात ‘शांताबाई’ या गाण्याने चांगलाच कहर केला होता. या गाण्याने भल्याभल्यांनाही नाचवायला लावले. याच शांताबाईने आता व्हॉट्सअॅप, फेसबुक या प्रसारमाध्यमांनाही वेड लावले आहे.
पुण्याचे संजय लोंढे यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून शांताबाई या गाण्याची रचना केली. या गाण्याला उत्कृष्ट संगीत आणि चाल दिल्यामुळे त तरुणांच्या गळ्यामधील ताईत बनले.
याबद्दल प्रसारमाध्यमांनी त्यांचे कौतुकही केले. अनेकांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थापही दिली. गणेशोत्सवाच्याच काळात या गाण्याचे प्रसारण झाल्यामुळे या गाण्याला मोठी लोकप्रियता मिळाली. या गाण्याने चांगलाच कहर केला. भल्याभल्यांना या गाण्याच्या तालावर नाचायला भाग पाडले. या गाण्याला एवढी प्रसिद्धी मिळाली, की व्हॉट्सअॅप, फेसबुक यासारख्या प्रसारमाध्यमांवरही शांताबाई झळकू लागली. आमचा ग्रुप अॅडमिन हरवला आहे. सापडल्यास त्याच्या दोन कानाखाली वाजवून घरी पाठवून द्या सुक्काळीच्याला. शेतात सोयाबीन काढायचा टाकून गावभर शांताबाई शांताबाई करीत बोंबलत फिरतोय. गावात यासारख्या अनेक विनोदी किश्शांची जागा या शांताबाईने घेतली आहे. सध्या व्हॉट्सअॅप, फेसबुक यासारख्या प्रसारमाध्यमांनीही शांताबाईला प्रसिद्धी देऊन ही माध्यमे वापरणाऱ्यांना अक्षरश: वेड
लावले आहे. (वार्ताहर)