महापुरुष हे समाजाला प्रेरकशक्ती : डॉ. श्रीपाल सबनीस; शांताई संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:24 PM2018-02-22T12:24:56+5:302018-02-22T12:30:00+5:30
जातीधर्मापलीकडे जाऊन एकात्म आणि एकसंध होण्यासाठी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्यासह अनेक थोर महापुरुष हे प्रेरकशक्ती आहेत. असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
येरवडा : महापुरुष हे कोण्या एका जातीचे अथवा धर्माचे नसतात. सर्वसामान्यांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचा जीवनसंघर्ष असतो. त्यामुळे जातीधर्मापलीकडे जाऊन एकात्म आणि एकसंध होण्यासाठी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्यासह अनेक थोर महापुरुष हे प्रेरकशक्ती आहेत. असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
शांताई संस्थेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त आयोजित प्रबोधनपर व्याख्यान आणि विविध पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सबनीस बोलत होते.
या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते. शांताई संस्थेचे संचालक अॅड. संपतराव कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
शांताई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब कांबळे, संचालिका रश्मी शागीरल यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अरुण कांबळे, सतीश कांबळे, अनिल कांबळे, पोपट कांबळे, गौतम कांबळे, दिनेश देशमुख, देवीदास जाधव, दीपक मोरे यांनी विशेष सहकार्य केले.
डॉ. सबनीस या वेळी पुढे म्हणाले, की छत्रपती शिवाजीमहाराजांनी माणुसकीच्या मूल्यांवर आधारित स्वराज्य निर्माण केले होते. सर्व जातीधर्माचे सहकारी त्यांनी सोबत घेतले होते. त्यामुळे वर्तमानातील प्रश्न सोडविण्यासाठी तसेच भविष्यकाळ सुधारण्यासाठी शिवाजीमहाराजांच्या कर्तृत्वातील आणि इतिहासातील प्रेरक सूत्र स्वीकारले पाहिजेत.
शांताई संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून भरीव योगदान देणाऱ्या तीन मान्यवरांना पुरस्कार देऊन या वेळी सन्मानित करण्यात आले. शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष आणि येरवडा येथील श्रीशिवराय नागरी पतसंस्थेचे संस्थापक अरुण वाघमारे यांना या वेळी जाणता राजाङ्ख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे नगरसेविका हिमाली नवनाथ कांबळे यांना जिजाऊङ्खपुरस्काराने आणि स्व. वरूणिका संपत कांबळे स्मृती पुरस्कार प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्या जेनिस सोमजी यांना देऊन या वेळी सन्मानित करण्यात आले. छत्रपती शिवाजीमहाराजांची प्रतिमा असलेले आकर्षक स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, मोत्याची माळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. बंडगार्डन येथील जॉगर्स पार्क येथे शांताई संस्थेच्या वतीने समाजातील गरजू, अनाथ, निराधार, वंचित, शोषित, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना आणि महिलांना शूज आणि चप्पल या वेळी वितरीत करण्यात आले. तसेच शांताई संस्थेच्या वतीने आयोजित ब्युटी पार्लर, शिवणकाम प्रशिक्षण, आणि जनरल ड्युटी असिस्टंट (असिस्टंट नर्स) या वर्गाच्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना तसेच महिलांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या वेळी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सायरस गोलवाला, डॉ. विशाल मुरकुटे, सुनिल जाधव, अमोल राजगुरू, नरेश चव्हाण, श्रीशिवराय नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत बराटे, संचालक सुहास राजगुरू, इक्बाल सय्यद, गणेश बाबर, संजय भोसले यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. शांताई संस्थेचे बाबूसाहेब कांबळे यांनी कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. रश्मीताई शागिरल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर शैलेश तुरवणकर यांनी आभार मानले. प्रा. राहुल राजगुरू यांचे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या प्रेरणादायी जीवनचरित्रावर प्रबोधनपर व्याख्यान झाले.