पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ सहा महिन्यांसाठी तडीपार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 09:47 AM2022-07-06T09:47:38+5:302022-07-06T09:47:54+5:30
आगामी निवडणुकीत त्याच्याकडून गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली
पुणे : दहशतवादी कातील सिद्दीकी याचा येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये खून करणारा व पुराव्याअभावी निर्दोष सुटलेला कुख्यात गुंड शरद मोहोळ याला सहा महिन्यांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातून तडीपार केले आहे. आगामी निवडणुकीत त्याच्याकडून गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता असल्याने पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी ही कारवाई केली.
पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात शरद हिरामण मोहोळ (वय ३८, रा. माऊलीनगर, सुतारदरा, कोथरुड) याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. टोळी युद्धातून गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणे याचा नीलायम चित्रपटागृहाजवळ एका हॉटेलमध्ये त्याने २०१० मध्ये खून केला होता. या खटल्यात सत्र न्यायालयाने शरद मोहोळ याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्याला गेल्यावर्षी जामीन मंजूर केला होता. कारागृहाबाहेर आल्यानंतर मोहोळ आणि साथीदारांनी दहशत माजविण्याचे गुन्हे केले होते.
खडक पोलीस ठाणे व हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हे नाेंदवण्यात आले होते. मोहोळला शहरातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचा प्रस्ताव कोथरुड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी भास्कर बुचडे, अजय सावंत, अनिल बारड यांनी तयार केला. त्यानंतर मोहोळला शहरातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले.
पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून शरद मोहोळ याची ओळख आहे. शरद मोहोळ टोळीने सरपंचाचे अपहरण करून खंडणी उकळल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. मोहोळ आणि आलोक भालेरावला येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी दहशतवादी कातील सिद्दीकी याचा नाडीने गळा आवळून खून केला होता.