शरद मोहोळ खून प्रकरण: गुन्ह्याच्या अनुषंगाने एकत्रित तपासासाठी सात आरोपींना पोलिस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 01:40 PM2024-02-03T13:40:25+5:302024-02-03T13:41:44+5:30

विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी या तपासात आणखी कुणाचा सहभाग आहे का? हे तपासायचे असल्याने आठ दिवस पोलिस कोठडी द्यावी, असे सांगितले...

Sharad Mohol murder case: Seven accused in police custody for joint investigation in connection with the crime | शरद मोहोळ खून प्रकरण: गुन्ह्याच्या अनुषंगाने एकत्रित तपासासाठी सात आरोपींना पोलिस कोठडी

शरद मोहोळ खून प्रकरण: गुन्ह्याच्या अनुषंगाने एकत्रित तपासासाठी सात आरोपींना पोलिस कोठडी

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाचा तपास हा गुन्ह्याचा रचलेला कट, तयारी आणि प्रत्यक्ष घडलेली घटना अशा तिन्ही दृष्टिकोनातून केला जात आहे. हा गुन्हा करण्यापूर्वी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांची जिथे बैठक झाली. त्या बैठकीबाबतची चौकशी करणे सोबतच अटक केलेल्या आरोपींकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने एकत्रित तपास करायचा आहे. गोपनीय अहवालानुसार महत्त्वपूर्ण तपास करणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे आरोपींना आठ दिवस पोलिस कोठडीची मागणी तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी केली. त्यानुसार विशेष मोक्का न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी सात आरोपींना ९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

शरद मोहोळ खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विठ्ठल शेलार, साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपास अधिकारी सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले की, आतापर्यंत या गुन्ह्यात १६ आरोपींना अटक झाली आहे. मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह सर्व आरोपींची एकत्रित चौकशी करायची आहे. आरोपींनी काही प्रॉपर्टी खरेदी केली आहे का? त्या अनुषंगाने तपास करायचा आहे.

विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी या तपासात आणखी कुणाचा सहभाग आहे का? हे तपासायचे असल्याने आठ दिवस पोलिस कोठडी द्यावी, असे सांगितले. त्यावर आरोपींचे वकील केतन कदम यांनी पोलिसांना तपासाला पूर्ण वेळ दिला आहे. दरवेळी पोलिस नवीन थिअरी समोर आणतात. त्यामुळे कमीत कमी पोलिस कोठडी द्यावी, असे त्यांनी सांगितले. त्यावर तपासाच्या अनुषंगाने दरवेळी नवीन माहिती समोर येत असल्याचे उत्तर तपास अधिकारी यांनी दिले. गणेश मारणेला ९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. त्यानुसार या आरोपींना देखील आठ दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी तपास अधिकारी तांबे यांनी केली. त्यानुसार आरोपींना ९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

Web Title: Sharad Mohol murder case: Seven accused in police custody for joint investigation in connection with the crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.