Sharad Mohol: १० वर्षापूर्वीच्या जमिनीच्या वादातून मोहोळचा गेम, २ वकिलांच्या सल्ल्याने रचला कट
By विवेक भुसे | Published: January 6, 2024 03:25 PM2024-01-06T15:25:49+5:302024-01-06T15:27:26+5:30
१० वर्षापूर्वी झालेल्या जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे...
पुणे : गँगस्टर शरद मोहोळ याचा भर रस्त्यात गोळ्या झाडून खून करणार्या साहिल पोळेकर याच्यासह त्याला मदत करणार्या ८ जणांना ८ तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दोन वकिलांच्या सल्ल्याने नामदेव कानगुडे याने मोहोळचा गेम करण्याचा कट रचला. त्यासाठी मोहोळच्या टोळीत मुन्ना पोळेकर याला घुसवले होते. त्यातूनच त्याची सर्व माहिती कानगुडे याला मिळत होती. १० वर्षापूर्वी झालेल्या जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर(वय २०, रा. सुतारदरा, कोथरुड), विठ्ठल किसन गांदले (वय ३४, रा. सुतारदरा, कोथरुड), अमित मारुती कानगुडे (वय २४, रा. धायरी), नामदेव महिपत कानगुडे (३५, रा. भूगाव), चंद्रकांत शाहु शेळके (वय २२, रा. जनता वसाहत, पर्वती), विनायक संतोष गाव्हणकर (वय २०, रा. जनता वसाहत, पर्वती), ॲड. रवींद्र वसंतराव पवार (वय ४०, रा. नांदे आणि ॲड. संजय रामभाऊ उडान (वय ४५, रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. नामदेव कानगुडे हा पूर्वी सुतारदरा येथे शरद मोहोळ याच्या घराजवळ रहात असे. त्यांच्यात वाद झाल्यानंतर तो भूगावला राहण्यास गेला होता. त्यावेळी झालेल्या वादाच्या रागातून तो मोहोळ याचा काटा काढण्याची संधी शोधत होता.
याबाबत अरुण धुप्रद धुमाळ (वय ३२, रा. जयभवानीनगर, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शरद मोहोळ याच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने दगडुशेठ गणपती मंदिरात साथीदारांसह दर्शनाला जात असताना सुतारदरा येथे दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास मुन्ना पोळेकर हाही शरद मोहोळ याच्या बरोबर जात होता. फिर्यादी व प्रमोद साठे हे मागून जात होते. त्यावेळी पोळेकर व त्याच्या साथीदारांनी शरद मोहोळवर गोळ्या झाडल्या. प्रमोद साठे हल्लेखोरांकडे धावला, तेव्हा त्यालाही पिस्तुलाचा धाक दाखवत ते पळून गेले. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळवर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यु झाला.
या घटनेची माहिती मिळताच शहर गुन्हे शाखा अलर्ट झाली. गुन्हे शाखेचे सर्व युनिट संशयितांचा शोध घेत असताना ते कोल्हापूरच्या दिशने जात असल्याचे आढळून आले. पुणे सातारा रोडवर किकवी ते शिरवळ दरम्यान एका स्विफ्ट गाडीतून जात असल्याचे दिसल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. आठ आरोपींकडून ३ पिस्टल, ३ मॅगझीन, ५ जीवंत काडतुसे, ८ मोबाईल व गाडी असा २२ लाख ३९ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त रितेशकुमार, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, अजय वाघमारे, क्रांतीकुमार पाटील, सहायक निरीक्षक अभिजित पाटील, पोलीस अंमलदार चेतन शिरोळकर, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, सैदोबा भाेजराव, अमोल पिलाणे, अमोल आव्हाड, राजेंद्र लांडगे, रवींद्र फुलपगारे, दुर्योधन गुरव, सयाजी चव्हाण, विजय कांबळे, प्रविण ढमाल, विजय कांबळे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, अभिनव लडकत, शशिकांत दरेकर, ज्ञानेश्वर चित्ते, सुमित ताकपेरे, श्रीकांत दगडे, साई करके, ऋषिकेश ताकवणे, नितीन मुंडे यांनी ही कामगिरी केली आहे.