फुटीनंतर शरद पवार अन् अजितदादा प्रथमच एका मंचावर; मोदींच्या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 03:20 PM2023-07-31T15:20:16+5:302023-07-31T15:38:02+5:30
महाराष्ट्राच्या राजकारणाला २०१९ पासून बरेच धक्के बसू लागले आहेत
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि. १ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी ११ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात त्यांच्या हस्ते पूजाअर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर ठीक ११:४५ वाजता सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळा होणार आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अजित पवारही उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाला २०१९ पासून बरेच धक्के बसू लागले आहेत. महाविकास तयार होऊन राज्यात सत्ताबदल होणे. त्यानंतर पुन्हा शिंदे गट भाजपसोबत जाऊन भाजप शिंदेंचं नवीन सरकार येणे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची जगभरात चर्च सुरु झाली होती. अशातच राष्ट्रवादीच्या फुटीमुळे नाट्यसत्तांतराला वेगळेच वळण आले. अजित पवार आमदार घेऊन भाजप आणि एकनाथ शिंदे गटासोबत गेले. महाराष्ट्राच्या राजकारणात निष्ठावंत राजकीय नेत्यांना हा मोठा धक्काच होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे २ गट पडले. अजितदादांनी आमचा विठ्ठल एकच असल्याचे सांगितले. त्यांनी शरद पवारच आमचे नेते असल्याचे जाहीरही केले. परंतु शरद पवारांनी अजित पवार हे राष्ट्रवादीत नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. या घडामोडींमध्ये अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी शरद पवारांची भेटही घेतली. पण शरद पवार यांनी त्या भेटीनंतर काही प्रतिक्रिया दिली नाही. आणि आम्ही कोणाबरोबरही जाणार नसल्याचे सांगितले. आता या महानाट्यानंतर शरद पवार आणि अजित पवार आता एका मंचावर येणार आहेत. ते समोरासमोर आल्यावर काय चित्र असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
त्यानंतर दुपारी १२:४५ वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पुणे मेट्रो टप्पा १ च्या कार्य पूर्ण झालेल्या फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या दोन मार्गिकांचे उद्घाटन करणार आहेत.
सर्वांसाठी घरे या उद्दिष्टपूर्तीच्या ध्येयाकडे वाटचाल करत, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारे बांधण्यात आलेली १२८० हून अधिक घरे पंतप्रधानांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेली २६५० हून अधिक घरेदेखील पंतप्रधान हस्तांतरित करणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारे बांधण्यात येणाऱ्या सुमारे ११९० घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या ६४०० हून अधिक घरांची पायाभरणीदेखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.