हडपसरमध्ये शरद पवार अन् राज ठाकरेंची तोफ धडाडणार; गुरुवारी दोघांच्या जाहीर सभा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 18:52 IST2024-11-12T18:49:34+5:302024-11-12T18:52:25+5:30
हडपसरमध्ये महायुतीचे चेतन तुपे, आघाडीचे प्रशांत जगताप आणि मनसेचे साईनाथ बाबर अशी तिरंगी लढत होणार

हडपसरमध्ये शरद पवार अन् राज ठाकरेंची तोफ धडाडणार; गुरुवारी दोघांच्या जाहीर सभा
पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारासाठी गुरुवारी (दि. १४) माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची जाहीर सभा हाेणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांच्या प्रचारासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभादेखील याच मतदारसंघात होणार आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने चेतन तुपे, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप, मनसेचे साईनाथ बाबर आणि अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्यामध्ये लढत होत आहे. या मतदारसंघात चौरंगी लढत होत असल्यामुळे प्रचाराची राळ उडाली आहे. प्रचार फेऱ्या, पदयात्रा आणि रोड शो मुळे प्रचारात रंगत आली आहे. येत्या १४ नोव्हेंबर रोजी या मतदारसंघात शरद पवार आणि राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारासाठी १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता माळवाडी येथील महापालिकेच्या नाट्यगृहासमोर जाहीर सभा होणार आहे. याच दिवशी वैभव थिएटरच्या मागे शाळा क्रमांक ३२ च्या समोरील रस्त्यावर मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांच्या प्रचारासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सायंकाळी ५ वाजता जाहीर सभा होणार आहे.