Sharad Pawar: दिल्लीतील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यपदी शरद पवार

By श्रीकिशन काळे | Published: December 2, 2024 07:34 PM2024-12-02T19:34:28+5:302024-12-02T19:35:21+5:30

शरद पवार हे केवळ उत्तम वाचक अथवा साहित्यप्रेमी नसून, महाराष्ट्रातून सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीशी प्रारंभापासून जोडले गेले आहेत

Sharad Pawar at the reception of the 98th Sahitya Samelan in Delhi | Sharad Pawar: दिल्लीतील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यपदी शरद पवार

Sharad Pawar: दिल्लीतील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यपदी शरद पवार

पुणे : दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नावाची घोषणा आज सोमवारी (दि.२) संयोजक संजय नहार यांनी केली.

सरहद संस्था आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि.२१, २२, २३ फेब्रुवारी २०२५ या काळात दिल्लीला होणार आहे. यापूर्वी १९५४ साली दिल्लीला ३७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ, संमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी तर उद्घाटक तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला या संमेलनानंतर बळ मिळाले आणि १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर दिल्लीला एकदाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले नाही. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर ७० वर्षांनी दिल्लीत होणार्‍या या संमेलनाचे आयोजन सरहद संस्थेद्वारे केले जात असून त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसेचे नेते राज ठाकरे, नितीन गडकरी आदी नेत्यांना विविध कार्यक्रमात संस्थेने निमंत्रित केले होते. या पुढील कार्यक्रमांमध्ये आणि व्यवस्थांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नागरी उड्डयन मंत्री, मुरलीधर मोहोळ आणि  विनोद तावडे यांचे सहकार्य घेतले जाईल.

दिल्ली ही देशाची राजकीय राजधानी असल्यामूळे येथे होणारे संमेलन सर्वसमावेशक व्हावे या भावनेतून या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अनुभवी, ज्येष्ठ व साहित्यरसिक व्यक्ती व्हावी असा संयोजक समितीने प्रयत्न केला त्यातून शरद पवार यांनी स्वागताध्यक्ष व्हावे अशी संस्थेने विनंती केली. आणि ती त्यांनी आज मान्य केली. शरद पवार हे केवळ उत्तम वाचक अथवा साहित्यप्रेमी नसून, महाराष्ट्रातून सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीशी प्रारंभापासून जोडले गेले आहे. त्यांनी औरंगाबाद (2004), नाशिक (2005), चिपळूण (2013) आणि सासवड (2014) येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले आहे तर 1990 साली त्यांनी स्वागताध्यक्ष व्हावे असे पुण्यातील संमेलनात समितीने ठरविले होते, मात्र त्यावर्षी ते होऊ शकले नाही. यंदा दिल्लीमध्ये महाराष्ट्राची अस्मिता ज्या व्यक्तींभोवती केंद्रीत असते त्यातून सर्वात ज्येष्ठ नाव शरद पवार यांचे आहे. त्यांच्या अनुभवांमुळे हे संमेलन अविस्मरणीय होईल आणि राजकारणाच्या पलिकडे जाऊन मराठी भाषा आणि संस्कृतीचा जागर करणारे ठरेल, असा विश्वास सरहद संस्थेच्या आयोजकांनी व्यक्त केला. यावेळी प्रा. मिलिंद जोशी, सुनिताराजे पवार, सतीश देसाई उपस्थित होते. 

Web Title: Sharad Pawar at the reception of the 98th Sahitya Samelan in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.