"पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली", शरद पवार यांचं मोठं विधान; केला मोठा खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 12:54 PM2023-02-22T12:54:09+5:302023-02-22T12:55:04+5:30
पहाटेच्या शपथविधीबाबत अधिक बोलण्यास अजित पवार वारंवार नकार देत असतात.
पुणे-
पहाटेच्या शपथविधीबाबत अधिक बोलण्यास अजित पवार वारंवार नकार देत असतात. तर राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पहाटेच्या शपथविधीबाबत पवारांना कल्पना होती असं विधान करत खळबळ उडवून दिली होती. याबाबत आता थेट शरद पवार यांनीच मोठं विधान केलं आहे. पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली नसती, असं मोठं विधान शरद पवार यांनी केलं आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पॉलिटिकल मिस्ट्री सुरू आहे ज्यावर अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात. फडणवीस म्हटले होते की अजित पवारांसोबत जे सरकार झालं त्याची माहिती शरद पवारांना होती. अजित पवार देखील याबाबत काहीच बोलत नाहीत. नेमकं काय घडलं होतं ते तुम्हीच स्पष्ट करा, असा सवाल शरद पवार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. त्यावर पवारांनी केलेल्या विधानानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
"सरकार बनवण्याचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला की राष्ट्रपती राजवट होती ती उठली. ती उठल्यानंतर काय घडलं ते तुम्हा सर्वांनाच माहित आहे", असं शरद पवार म्हणाले आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला. राज्यात तेव्हा तसं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? आणि उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले असते का?, असं शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्रात काही झालं की एका व्यक्तीचं नाव येतं
शरद पवारांनी केलेल्या विधानावर म्हणजे जे सगळं घडलं त्याला तुमचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता का? राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी हे सारं केलं गेलं होतं का? असा प्रतिप्रश्न केला गेला असता पवारांनी महाराष्ट्रात काहीही झालं की एका व्यक्तीचं नाव येतं हे आपल्या राज्याचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल असं मिश्किल उत्तर दिलं. लातूरला भूकंप झाला त्याला कारणीभूत देखील मीच होतो असंही बोललं गेलं, असंही पवार म्हणाले.